गेल्या काही दिवसापूर्वी तीन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याच्या प्रकरणात एका महिलेला पोलिसांनी रंगेहात पकडले होते. या महिलेला पोलिसांनी अटक केली. यानंतर आता पुण्यातील कोरेगाव पार्क भागातील प्रभाकर देशमुख यांच्या घरी सातारा पोलीस दाखल झाले. मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर सातत्याने आरोप करणारे पत्रकार तुषार खरात यांना देखील यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर विविध कलमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणासंदर्भात सातारा पोलीस प्रभाकर देशमुख यांच्याकडे आल्याची माहिती मिळत आहे.
काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात तक्रार करणार्या महिलांच्या संपर्कात प्रभाकर देशमुख होते, असे सांगितले होते. त्या संदर्भाने देशमुख यांची सातारा पोलिसांनी चौकशी केली. तब्बल तीन तास चौकशी करून सातारा पोलीस प्रभाकर देशमुख यांच्याकडून रवाना झाले आहेत. त्यामुळे आता हे प्रकरण कोणते नवीन वळण घेते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.