सातारा : राज्यभर गाजत असलेल्या स्मार्ट मीटरच्या मुद्द्यावर आता सातारा जिल्ह्यातही राजकीय संघर्ष तीव्र होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. महावितरण कंपनीकडून घरगुती तसेच उद्योग-व्यवसायिक ग्राहकांवर स्मार्ट मीटर बसविण्याची सक्ती केली जात असल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने शुक्रवारी (दि. 10) दुपारी 2 वाजता कृष्णानगर येथील महावितरण कार्यालयावर आक्रमक आंदोलन छेडण्यात येणार आहे.
या आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील करणार असून, महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होणार असल्याची माहिती जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील यांनी दिली.
महावितरणने सातारा जिल्ह्यात स्मार्ट मीटर बसविण्याचा निर्णय घेतला असला, तरी या धोरणामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील ग्राहकांवर भविष्यात अतिरिक्त वीज बिलांचा आर्थिक बोजा पडण्याची शक्यता असल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. स्मार्ट मीटर धोरण हे सर्वसामान्य वीज ग्राहकांच्या हिताचे नसून खासगी कंपन्या आणि भांडवलदारांना लाभदायक ठरणारे असल्याचा दावाही पक्षाने केला आहे.
स्मार्ट मीटरची सक्ती तात्काळ मागे घेण्यात यावी, अन्यथा जिल्हाभर तीव्र जनआंदोलन उभारण्यात येईल, असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने दिला आहे. सातारा जिल्ह्यात स्मार्ट मीटरविरोधातील लढ्याचे रणशिंग फुंकण्यात आले असून, ही केवळ सुरुवात असल्याचे पक्षाच्या नेत्यांनी स्पष्ट केले आहे.
युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष समीर घाटगे यांनी युवक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व नागरिकांनीही स्मार्ट मीटर सक्तीविरोधात एकजूट दाखवत आंदोलनात सहभागी व्हावे आणि आपला आवाज बुलंद करावा, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.
दरम्यान, राज्यातील विविध भागांत स्मार्ट मीटरविरोधात सुरू असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर सातार्यातील हे आंदोलन महत्त्वाचे मानले जात असून, महावितरण कार्यालयासमोर उद्या मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी आणि शक्तिप्रदर्शन होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.