सातारा : करंजे गणेश कॉलनी परिसरात घरफोडीची आणखी एक गंभीर घटना समोर आली आहे. येथील रहिवासी अभिजीत हिराराल दोशी (वय ५०) यांच्या बंद घराचा सेफ्टी दरवाजा आणि लाकडी दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे ३ लाख ७९ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम चोरून नेल्याची घटना दि. ९ रोजी रात्री घडली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रात्री साडेबाराच्या सुमारास घर बंद असताना चोरट्यांनी दरवाजे तोडून घरात प्रवेश केला. आतमध्ये असलेल्या कपाटातील दागिने व रोख रकमेवर हात साफ करून चोरटे फरार झाले. चोरीची माहिती मिळताच शाहूपुरी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.घटनास्थळाची पाहणी उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांनी केली. तसेच पंचनामा करून पुढील तपासाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार शिंदे करीत आहेत.परिसरात वाढत्या घरफोड्यांच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.