सातारा : माण तालुक्यातील वरकुटे-मलवडी येथील अवैध हातभट्टी निर्मिती केंद्रावर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे भरारी पथक आणि सातारा जिल्हा पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने आज 11 जून 2026 रोजी संयुक्त छापा टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत सुमारे 2,725 लीटर रसायनासह एकूण 1 लाख 13 हजार 50 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
मानवी शरीरास हानिकारक आणि घातक असणार्या अवैध हातभट्टी दारू व इतर बनावट मद्यावर कडक कारवाई करण्यासाठी सातारा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे आणि राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक बाबासाहेब भुतकर यांच्या आदेशान्वये 11 ते 13 जून दरम्यान विशेष मोहीम आखण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत वरकुटे-मलवडी येथे छापा टाकला असता, हातभट्टी दारू तयार करण्यासाठी लागणारे कच्चे रसायन जमिनीमध्ये पुरून ठेवल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. अधिकार्यांनी ट्रॅक्टरच्या साहाय्याने जमिनीतून 10 लोखंडी पत्र्याचे बॅरेल बाहेर काढून त्यातील रसायन आणि इतर साहित्य जप्त केले.
ही यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक (स्थानिक गुन्हे शाखा) विश्वजीत घोडके, राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाचे निरीक्षक माधव चव्हाण, उपनिरीक्षक अजयकुमार पाटील, आणि जवान अजित रसाळ, आबासाहेब जानकर, अरुण जाधव, बाळासो पाचुंदे तसेच पोलीस अंमलदार पो.हवा. सनी सुरेश आवटे, नवनाथ रामदास कदम, अमृत सावता कर्पे, अमित जगन्नाथ सपकाळ आणि ओंकार अंकुश यादव यांच्या संयुक्त पथकाने पार पाडली.
अवैध हातभट्टी दारू किंवा बनावट ताडी पिल्यामुळे नागरिकांच्या जीवितास मोठा धोका निर्माण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, अशा घातक मद्याचे प्राशन न करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. तसेच सातारा जिल्ह्यात कुठेही अवैध मद्य निर्मिती, वाहतूक किंवा विक्री होत असल्यास नागरिकांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 18002339999 या टोल फ्री क्रमांकावर किंवा 8422001133 या व्हॉट्सप क्रमांकावर संपर्क साधून तक्रार नोंदवावी, असे आवाहन अधीक्षक बाबासाहेब भुतकर यांनी केले आहे. तक्रारदाराचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल, अशी ग्वाही देखील त्यांनी दिली आहे.