कराड तालुक्यातील शहापुरात बिबट्याचा हल्ला ; दोन दिवसांत तीन युवक जखमी

by Team Satara Today | published on : 29 March 2026


​कराड :कराड तालुक्यातील शहापूर परिसरात बिबट्याच्या हल्ल्यांचे सत्र सुरूच असून, गेल्या दोन दिवसांत बिबट्याने केलेल्या वेगवेगळ्या हल्ल्यांत तीन युवक गंभीर जखमी झाले आहेत. शनिवारी सायंकाळी एका युवकावर, तर रविवारी दोन युवकांवर बिबट्याने झडप घातल्याने संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. लागोपाठ घडलेल्या या घटनांमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीसह वनविभागाच्या कार्यक्षमतेबाबत संताप व्यक्त केला जात आहे.

​शहापूर येथील अंतवडी रस्त्यावरील 'पन्नाशी' शिवारात शनिवारी सायंकाळी ही पहिली घटना घडली. निखिल मारुती वांगडे हा युवक शेतात पिकाला पाणी देण्यासाठी गेला असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर अचानक हल्ला केला. यावेळी निखिलने घाबरून न जाता हातात असलेल्या खोऱ्याने बिबट्याचा प्रतिकार केला. त्याच्या धाडसामुळे आणि आरडाओरडामुळे बिबट्याने तेथून धूम ठोकली. या झटापटीत निखिल जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना ताजी असतानाच रविवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास जयवंत फसाले यांच्यावर बिबट्याने हल्ला चढवला. बिबट्याने त्यांच्या डोक्यावर पंजा मारल्याने ते रक्तबंबाळ झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी कराड येथे हलवण्यात आले.

​दरम्यान, याच दिवशी दुपारी गावाजवळील पाण्याच्या टाकी परिसरात सौरभ कदम या युवकावरही बिबट्याने हल्ला केल्याची तिसरी घटना घडली. यात सौरभ जखमी झाला असून त्याला कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शहापूर, वडोली निळेश्वर, शिरवडे आणि रिसवड या पट्ट्यात गेल्या महिनाभरापासून मादी बिबट्या आपल्या दोन बछड्यांसह वावरत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

गेल्या आठवड्यातही रिसवड येथे बिबट्याने शेळ्यांचा फडशा पाडला होता. वाढत्या घटनांची दखल घेत आमदार मनोज घोरपडे यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी ललिता पाटील यांना तातडीने पिंजरा लावण्यासह उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. वनविभागाने या भागात गस्त वाढवली असून, शेतकऱ्यांनी शेतात जाताना समूहाने जावे आणि रात्री एकटे फिरणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
साताऱ्यात सयाजी विद्यालयासमोर टायर फुटून कार पलटी ; तिघे जण जखमी
पुढील बातमी
मेंढ्या मागे-पुढे जाण्याच्या कारणातून दोन गटात वाद; परस्‍पर विरोधी तक्रारी दाखल

संबंधित बातम्या