सातारा एमआयडीसीतील एका कंपनीतील तब्बल 79.52 लाखांचा माल लंपास; तीन कर्मचार्‍यांवर गुन्हा

by Team Satara Today | published on : 08 October 2026


सातारा : दाना आनंद इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या ताब्यातील तब्बल 79 लाख 52 हजार 310 रुपये किमतीचे ऍल्युमिनिअम व विविध ऑटोमोबाईल पार्ट्स संगनमताने चोरी केल्याप्रकरणी कंपनीतील तीन कर्मचार्‍यांविरुद्ध सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे औद्योगिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रज्योत सुरेश साळुंखे (वय 28, रा. देगाव,सातारा), वैभव बबन पोळ (वय 38, रा. अमरलक्ष्मी, मूळ रा. कोर्टी, ता. कराड, जि. सातारा) आणि राहुल चंद्रकांत शेळके (वय 42, रा. खिंडवाडी, ता. जि. सातारा) यांनी आपापसांत संगनमत करून कंपनीची कोणतीही परवानगी न घेता, कंपनीचे कर्मचारी म्हणून काम करत असताना त्यांच्या ताब्यातील माल चोरी केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
चोरीस गेलेल्या मालामध्ये ट्यूब योक, ऍल्युमिनिअम ट्यूब योक, यू.जे. क्रॉस यांसह विविध पार्ट्सचा समावेश आहे. यामध्ये 7,229 नग ट्यूब योक, 3,379 नग ऍल्युमिनिअम ट्यूब योक तसेच हजारो नग यू.जे. क्रॉस पार्ट्सचा समावेश असून, या सर्व मालाची एकूण किंमत 79 लाख 52 हजार 310 रुपये असल्याचे पोलिसांत दाखल फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, ही चोरी एकाच दिवशी न होता 9 सप्टेंबर रोजी पहाटे तसेच 1 ऑक्टोबर रोजी रात्री झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी कमलाक्ष मदनमोहन माल्या (वय 39, सध्या रा. 201, चैतन्य रेसिडेन्सी, अजिंक्य कॉलनी, सदर बाजार, सातारा; मूळ रा. हुबळी, कर्नाटक) यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार तिन्ही संशयित कर्मचार्‍यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस हवालदार राऊत करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
आरळे परिसरातील तीन डीपींमधील 60 हजारांची तांब्याची तार चोरीला; अज्ञातांवर गुन्हा
पुढील बातमी
विकासनगर येथील व्यावसायिकाला मारहाण करून खंडणी मागितल्याप्रकरणी चार जणांवर गुन्हा

संबंधित बातम्या