सातारा : ग्रामपंचायत रिक्त सदस्य तसेच थेट सरपंच पदांसाठी मंगळवारी (दि. २८ एप्रिल २०२६) झालेल्या पोटनिवडणुकीत सायंकाळपर्यंत मतदानाला चांगला प्रतिसाद मिळाला. अंतिम आकडेवारीनुसार जिल्ह्यात ६२.५१ टक्के मतदान नोंदविण्यात आले.
तालुकानिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे - वाई : ७२.२८ टक्के (सर्वाधिक), सातारा : ७१.२४ टक्के, कराड : ६९.४४ टक्के, फलटण : ५९.०७ टक्के, खंडाळा : ५७.०० टक्के, खटाव : ५२.७७ टक्के, जिल्ह्यात एकूण २०,५६६ मतदारांपैकी १२,८५५ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यामध्ये ६,०२८ महिला व ६,८२७ पुरुष मतदारांचा सहभाग होता.
दिवसभर मतदान शांततेत पार पडले. सकाळी मंद गतीने सुरू झालेले मतदान दुपारनंतर वेगाने वाढले. ग्रामीण भागात सायंकाळी मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा दिसून आल्या. प्रशासनाने सर्व केंद्रांवर सुरक्षा व आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. एकूणच, या पोटनिवडणुकीत मतदारांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला असून, निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.