सातारा : सातारा पालिकेचे माजी नगराध्यक्ष, सातारा नगरपालिकेतील भाजपाचे पक्षप्रतोद निशांत पाटील यांनी २०२५ मध्ये झालेल्या सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीवेळी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात जाणूनबुजून खोटी माहिती सादर केली आहे. प्रतिज्ञापत्रामध्ये बऱ्याच मिळकती या घोषित न करता तसेच शासकीय, निमशासकीय थकबाकी असतानासुध्दा निरंक लिहून दिशाभूल केली होती.
याबाबत सामाजिक, माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निशांत पाटील यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करुन त्यांना अपात्र करण्याबाबत दि. २३ फेब्रुवारी २०२६ रोजी पुराव्यानिशी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची जिल्हाधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेऊन प्रांताधिकारी यांची नियुक्ती करुन चौकशीचे आदेश दिले आहेत. त्याबाबत आता उपविभागीय अधिकारी आशिष बारकुल यांच्या दालनात २ जून रोजी सुनावणी होणार असून या सुनावणीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, माजी नगराध्यक्ष, नगरसेवक आणि आता भाजपाचे सातारा नगरपालिकेतील पक्षप्रतोद निशांत पाटील यांनी निवडणुकीच्यावेळी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात संपत्तीबाबत खोटी आणि दिशाभूल करणारी तसेच अपूर्ण माहिती देऊन फसवणूक केली असल्याचे माहिती अधिकारात मिळालेल्या कागदपत्रानुसार स्पष्ट झाले होते. याबाबत त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा आणि त्यांना अपात्र करावे अशी मागणी सामाजिक, माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. निशांत पाटील हे नगराध्यक्ष राहिले असून अनेक वर्षे नगरसेवक राहिले असल्याने त्यांना कायद्याचे संपूर्ण ज्ञान आहे. त्यामुळे काय दाखवावे, काय दाखवू नये याची त्यांना पूर्ण कल्पना आहे. तसेच अपूर्ण माहिती दाखल केल्यास तो गुन्हा होऊ शकतो याचेही त्यांना ज्ञान आहे.
प्रतिज्ञापत्रामध्ये अशी दडवादडवी करणे त्यांना शोभत नाही. सध्या ते भाजपाचे पक्षप्रतोद असूनही त्यांनी प्रतिज्ञापत्र दाखल करताना हेतुपुरस्पर खोटी माहिती दाखल केली हे गंभीर असून त्यांच्यावर तातडीने कारवाई होणे गरजेचे आहे, त्यासाठी तक्रार करण्यात आली आहे. त्यांनी चौकशीपूर्वीच नैतिकता दाखवून राजीनामा द्यावा. मी दिलेले पुरावे सही शिक्क्याचे असून प्रतिज्ञापत्र माहिती अधिकारात प्राप्त करुन घेतले असून नंतर तक्रार केली आहे. या तक्रारीबाबत २ जून रोजी प्रांताधिकाऱ्यांच्या दालनात सकाळी ११ वाजता सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. अनेक इतर नगरसेवकांचे कागदपत्रे व प्रतिज्ञापत्रे माहिती अधिकारात प्राप्त करुन घेतली असून त्याची पडताळणी सुरु आहे. ज्यांनी ज्यांनी खोटी माहिती अथवा प्रतिज्ञापत्रात स्थावर, जंगम मालमत्ता, शासकीय, निमशासकीय थकबाकी भरली नाही त्यांच्या बाबतीतही लवकरच तक्रार अर्ज दाखल करणार असल्याचा इशाराही श्री. मोरे यांनी दिला आहे.
...यावेळेस तोंडपाटीलकी महागात पडणार
निशांत पाटील हे तोंडपाटीलकी करण्यात प्रसिध्द आहेत. ते करताना त्यांनी अनेकाबद्दल तसेच नेत्यांविषयीही अपशब्द वापरले आहेत. परंतु माझे काय होत नाही ही त्यांची कायम भूमिका राहिली असल्याने आजही त्यांची तोंडपाटीलकी सुरुच आहे. पण यावेळेस ते पुराव्यानिशी कायद्याच्या कचाट्यात सापडले असून आता त्यांना हीच तोंडपाटीलकी महागात पडण्याची शक्यता आहे.
प्रॉपर्टीबाबत खुलासा करावा
पक्षप्रतोद निशांत पाटील त्यांचे उत्पन्नाचे साधन काय हे त्यांनी प्रतिज्ञापत्रात लिहिलेले नाही. इतर अनेक नगरसेवक विविध व्यवसाय, उद्योगधंदे करतात परंतु निशांत पाटील यांच्या उत्पन्नाचा स्त्रोत काय याबाबत स्पष्टता होत नाही त्यामुळे त्यांची असणारी संपत्ती ही गैरमार्गाने मिळवली असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे निशांत पाटील यांनी संपत्ती कशी आली याचा खुलासा करणे आवश्यक आहे आणि तो त्यांनी न केल्यास ही संपत्ती गैरमार्गाने आल्याची शक्यता धरुन त्या संपत्तीचीही चौकशी होण्याची गरज असल्याची मागणीही श्री. मोरे यांनी केली आहे.