सोन्याच्या दागिन्यांचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी लोणी काळभोरच्या एकास अटक; लोणंद पोलिसांची कारवाई

by Team Satara Today | published on : 24 September 2026


लोणंद : सोन्याच्या दागिन्यांचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी लोणंद पोलिसांनी जाफर शाहजमान इराणी (वय ४५, रा. लोणी काळभोर, जि. पुणे) याला अटक केली. त्याच्याविरुद्ध महाराष्ट्रातील विविध पोलीस ठाण्यांत चोरी, फसवणूक, घरफोडीचे तब्‍बल १०९ गुन्हे दाखल असल्याची नोंद पोलिस तपासात समोर आली आहे.
लोणंद येथील भैरवनाथ गल्ली परिसरात सोन्याचे दागिने देण्याचे आमिष दाखवून १ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक केल्याची फिर्याद लोणंद पोलिस ठाण्यात दाखल झाली होती. संशयित आरोपीने फिर्यादीचा विश्वास संपादन करून सोन्याचे गंडे देण्याचे भासवले. मात्र, त्यामध्ये सोन्याऐवजी अन्य धातूचा वापर करून फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद आहे. तपासादरम्यान पोलिसांनी अटक केली.
न्यायालयात हजर केल्यानंतर पुढील तपास सुरू आहे. इराणी याच्‍याविरुद्ध पुणे शहर व जिल्ह्यासह कराड, बारामती, यवत, वाकड, हडपसर आदी ठिकाणी २०१० ते २०२५ या कालावधीत विविध गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी जायपत्रे, उपनिरीक्षक विशाल जगताप व पथकाने ही कारवाई केली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
ऐतिहासिक वाढे, वडूथ पुलांवरून अखेर अवजड वाहतूक बंद; जनआंदोलन अन् पाठपुराव्याला मोठे यश, हलकी वाहने व एसटी बस मात्र सुरूच राहणार
पुढील बातमी
‘अजिंक्यतारा’ कारखान्याचे कामकाज दिशादर्शक : ना. नितीन गडकरी; अजिंक्यतारा कारखान्यास 'उच्च साखर उतारा' राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

संबंधित बातम्या