सातारा : सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा केल्यामुळे या निवडणुकानंतर कोणत्याहीक्षणी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता गृहीत धरून सातारा जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी आत्तापासूनच तयारी सुरू केली असून, ते आपापल्या गट व गणातील नागरिकांशी चर्चा करत विठ्ठला ! कोणता झेंडा घेऊ मी हाती.. अशी विचारणा करू लागले आहेत. इच्छुक उमेदवारांची उमेदवारीसाठी कोणत्याही पक्षात जाण्याची मानसिक तयारी झाल्यामुळे सातारा जिल्ह्यात होणाऱ्या आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्येही चांगलाच धुरळा उडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
गेल्या सहा वर्षापासून सातारा जिल्हा परिषदेसह जिल्ह्यातील सातारा, कोरेगाव, कराड, पाटण, खंडाळा, महाबळेश्वर, वडूज, फलटण, माण. पाटण, वाई, जावली तालुक्यातील पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या नाहीत. जिल्हा परिषदेसह पंचायत समित्यांमध्ये प्रशासकांची नियुक्ती केल्यामुळे जिल्ह्यातील विविध तालुक्यात विकास कामांचा मोठ्या प्रमाणावर खेळ खंडोबा झाला. जिल्ह्यातील ग्रामीण पाणी पुरवठा योजना, पाणंद रस्ते, प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा परिषद शाळांची देखभाल-दुरुस्ती, पाझर तलावांची निर्मिती अथवा गाळ काढणे, ग्रामीण भागातील रस्ते, वीज वितरण कार्यालयाशी संबंधित असे अनेक प्रश्न प्रलंबित राहिले. प्रशासकीय पातळीवर जेवढ्या समस्या सोडवता येतील तेवढ्या सोडवल्या गेल्या असल्या तरी अद्यापही जिल्ह्यामध्ये समस्यांची वाणवा आहे. त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांकडे लक्ष लागून राहिले होते. चार महिन्यांपूर्वी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी आरक्षण जाहीर झाल्यानंतर अनेक इच्छुक उमेदवारांच्या आशा पल्लवी झालेल्या होत्या. प्रत्यक्षात मात्र प्रथम राज्यातील नगरपालिकांच्या निवडणुका दोन टप्प्यात आणि त्यानंतर महापालिका निवडणुका घेण्याचे निश्चित करण्यात आले. त्यानंतर जिल्हा परिषदा व पंचायत समिती निवडणुकांची घोषणा होणार असल्यामुळे विविध राजकीय पदाधिकाऱ्यांची भ्रमनिराशा झाली.
गेल्या सहा वर्षात सातारा जिल्ह्यात अनेक राजकीय स्थितांतरे झाली. अजित पवार गटाने आपला सवतासुभा मांडत सत्तेत जाणे पसंत केले. दुसरीकडे तीन वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यामध्ये भाजपला सातारा- जावली, कराड उत्तर व दक्षिण, माण या चार विधानसभा मतदारसंघात यश मिळाले. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार फलटण आणि वाई- महाबळेश्वर- खंडाळा विधानसभा मतदारसंघातून निवडून आला. पाटणमधून एकनाथ शिंदे गटाच्या शंभूराजे देसाई तर कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून महेश शिंदे यांचा विजय झाला. सातारा जिल्हा हा एकेकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून समजला जात असताना याच राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा निवडणुकीत पानिपत झाले. त्यातच भाजपने शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि जयकुमार गोरे या दोघांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लावली. दोन कॅबिनेट मंत्री आणि दोन आमदार असे सध्या भाजपाचे जिल्ह्यात संख्याबळ असल्यामुळे भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी अक्षरशः रांगा लागल्याचे चित्र आहे.
नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये अन्य पक्षातील मान्यवरांना भाजपने आपल्या पक्षात प्रवेश दिल्यामुळे भाजप आणि एकनाथ शिंदे गटात फक्त राजकीय संघर्षाला प्रारंभ झाला. सध्या तरी सातारा जिल्ह्यात भाजप, एकनाथ शिंदे शिवसेना पक्ष आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे तीनच पर्याय असले तरी राजकीय पदाधिकाऱ्यांचा ओढा मात्र भाजपकडेच अधिक असल्यामुळे इच्छुकांची गर्दी पाहता कोणाला प्रवेश द्यायचा, असा प्रश्न भाजपाच्या नेतृत्वाला पडला आहे. दुसरीकडे सातारा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी इच्छुक असणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी मात्र आत्तापासूनच पायाला भिंगरी बांधली असून मतदार संघात दौरे काढून ते ग्रामस्थांशी चर्चा करत आहेत. कोणता पक्ष सुरक्षित आहे? कोणत्या पक्षाकडे उमेदवारीची मागणी करावी? याबाबतची चाचपणी करत विठ्ठला ! कोणता झेंडा घेऊ मी हाती..? अशी ते विचारणा करीत असताना दिसून येत आहेत.