विस्थापित 'चिंचणी' ची वाटचाल शाश्वत पर्यटनाकडे घेऊन जाणारी

निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील; सोलापूर जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची बैठक

by Team Satara Today | published on : 22 September 2025


सातारा  :  चिंचणी हे सातारा जिल्ह्यातून पंढरपूर येथे विस्थापित झालेले गाव आहे. या गावाने केलेले काम महाराष्ट्रात सर्वदूर पोहोचले असून ते आता देशपातळीवरील पर्यटकांना आकर्षित करण्याच्या अनुषंगाने वाटचाल करत आहे. ही वाटचाल खऱ्या अर्थाने शाश्वत पर्यटनाकडे घेऊन जाणारी असल्याचे मत निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांनी व्यक्त केले. 

सोलापूर सोशल फाउंडेशन व चिंचणी ग्रामीण कृषी पर्यटन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने  आमदार सुभाष (बापू) देशमुख यांच्या संकल्पनेतून सोलापूर जिल्हा पर्यटन महोत्सव साजरा होत आहे. या अनुषंगाने सातारा जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या विभागांमध्ये कार्यरत असणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची बैठक बोलवण्यात आली होती. 

या बैठकीस उपविभागीय अधिकारी  आशिष बारकुल  शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे ,पोलीस उपनिरीक्षक सुशील कदम, राकेश साळुंखे, विलास बाबा, जवळ बापू जवळ उद्योजक, विजय शेलार, शरद सावंत, मच्छिंद्र गोगावले आदी मान्यवर उपस्थित होते.

 

 या पर्यटन सप्ताह मध्ये चिंचणी येथे  27 सप्टेंबर जागतिक पर्यटन दिन ते 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती या सहा दिवसांमध्ये वेगवेगळे सामाजिक व सांस्कृतीक उपक्रम घेण्यात आलेले आहेत. याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी सातारा विश्रामगृह येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. या उपक्रमामध्ये प्रशासनातील अधिकाऱ्यांसह सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांनी यावेळी केले


यावेळी  डॉ. अविनाश पोळ म्हणाले,  चिंचणीकरांनी सातारा जिल्ह्याचे सत्व जोपासत सोलापूर जिल्ह्यामध्ये जाऊन रडत न बसता अडचणी व भौगोलिक परिस्थितीवर मात करत रचनात्मक काम उभे केले असून या नाविण्यपूर्ण प्रकल्पाला बळ देण्यासाठी सातारा जिल्ह्यातील सर्वजण या पर्यटन सप्ताह मध्ये सहभागी होऊयात.


 यावेळी मोहन अनपट यांनी प्रास्ताविक केले व शशिकांत सावंत यांनी आभार मानले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
नवरात्रीच्या उपवासाचे महत्त्व
पुढील बातमी
येत्या १०० दिवससांत विकासाची मोठी चळवळ संपूर्ण राज्यात उभी राहील

संबंधित बातम्या