अजितदादांच्या अपघाताचे राजकारण करू नका; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी नाव न घेता सुप्रिया सुळेंना सुनावले

by Team Satara Today | published on : 03 September 2026


पुणे : अजितदादांच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्रात जी पोकळी निर्माण झाली आहे ती किती आहे हे माझी मुलं आणि माझ्यापेक्षा कुणाला जास्त माहिती असणार?  अजितदादांच्या अपघाताचे राजकारण करू नका, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी नाव न घेता सुप्रिया सुळेंना सुनावले आहे. पुण्यात त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.
सुप्रिया सुळेंच्या टीकेवर प्रतिक्रिया देताना सुनेत्रा पवार म्हणाल्या की, दादांच्या अपघातानंतर काहीतरी ठोस निर्णय आला पाहिजे हे सर्वांना वाटत आहे आणि आम्हीही त्यादृष्टीने प्रयत्न करत आहोत. आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटून आलो आहोत हे सर्वांना माहित आहे. मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात शब्द दिला आहे. तो शब्द पाळण्यासाठी कसोशीने ते प्रयत्न करत आहेत. तपास यंत्रणा आपलं काम करत आहेत. माझा यंत्रणांवर, कायदा आणि संविधानावर विश्वास आहे. त्यामुळे त्यांनाही आपण वेळ दिला पाहिजे असं त्यांनी म्हटलं.
तसेच सतत मीडियामध्ये येणं म्हणजेच अपडेट मिळणे असे नाही. यामध्ये वारंवार मीडिया ट्रायल होत आहे का? अशी शंका उपस्थित करतानाच  दादांची आई, दादांची मुलं आणि मी यांच्यापेक्षा दु:ख कुणाला होणार आहे याचा विचार सर्वांनी करायला हवा अशी नाराजी सुनेत्रा पवारांनी बोलून दाखवली.
काय म्हणाल्या होत्या सुप्रिया सुळे?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो काढल्याप्रकरणी अमित ठाकरे यांच्यावर अवघ्या दोन तासांत गुन्हा दाखल होतो. मात्र, माझे बंधू अजित पवार यांच्या मृत्यूप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. माझ्या भावाच्या विमानाचा एवढा मोठा अपघात झाला. राष्ट्रवादीचा अजित पवार गट सत्तेचा भाग आहे की नाही? ४० आमदारांनी, ९ मंत्र्‍यांनी कधीतरी एफआयआर किंवा चौकशीवर एकही शब्दही काढलेला नाही अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली होती.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
राज्यातील १४२ सहाय्यक पोलिस निरीक्षकांच्या बदल्या
पुढील बातमी
कॉक्रोच जनता पार्टीच्या स्कूल ठीक करो मोहिमेला झटका; सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली, आता शाळेत जाण्यासाठी परवानगी घ्यावी लागणार

संबंधित बातम्या