सातारा : चल ग, सये वारुळाला, जाऊया नागोबाला पुजाऱ्यायाला ..असे म्हणत संपूर्ण सातारा जिल्ह्यात श्रावण शुद्ध पंचमी अर्थात नागपंचमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. रिमझिम पावसाच्या सरी अंगावर झेलत महिलांनी तसेच मुलींनी गावात विशेषत्वाने गावाबाहेर असणाऱ्या दगडी नागदेवतेचे पूजन करून आपल्या सर्व परिवारासाठी नागदेवतेकडे प्रार्थना केली व आशीर्वाद घेतले.
महिलांनी त्यानंतर फेर, फुगड्या घालून हा सण उत्साहात साजरा केला. नागदेवतेला लाह्या दूध व पांढरी फुले तसेच बेल वाहून पंचोपचार पूजा करून महिलांनी एकमेकीला हळद-कुंकू लावून सौभाग्याचे वाण दिले. सातारा जिल्ह्यात विशेष करून नागपंचमीला खास करून ग्रामीण भागात उंच झाडाला झोके बांधून झोक्यावर बसून महिलांनी विशेष आनंद लुटला संगम माऊली परिसरात हे झोके खेळण्यासाठी महिलांबरोबर लहान मुलीही मोठ्या उत्साहाने सहभागी झाल्या होत्या.
दरम्यान सातारा शहरा नजीकच्या कृष्णानगर परिसरात असलेल्या श्री उत्तर चिदंबरम नटराज मंदिरात आवारात असलेल्या दगडी नाग मूर्तीची विशेष पूजा करून महाआरती करण्यात आली. मंदिराच्या ब्रह्मवृंदांकडून या नागदेवतेला चंदन व हळदीचा लेप लावून शहाळ्याच्या पाण्याचा तसेच दुधाचा अभिषेक घालण्यात आला. तसेच विविध फळे आणि नारळाच्या फुलांनी सजावट करून नैवेद्य, आरती करण्यात आली. यावेळी परिसरातील अनेक भाविक विशेष करून महिलांची संख्या विशेष लक्षणीय दिसून येत होती. मंदिराचे वतीने या नागदेवतेचे मंदिर काही वर्षांपूर्वी बांधण्यात आले असून दरवर्षी नागपंचमीला दर्शनासाठी येथे गर्दी होत असते.