सातारा : स्मार्ट मीटर बसण्याविषयी जनतेमध्ये आक्रोश असताना विविध मार्गाने वीज ग्राहकांच्या माथी मारण्याचे षडयंत्र मोठ्या प्रमाणात सुरू असून त्याचाच परिणाम म्हणून प्रत्येकाने घराघरात स्मार्ट मीटर बसवावेत यासाठी वीज वितरण केंद्रमार्फत नेमलेल्या काही खाजगी कर्मचाऱ्यांकडून स्मार्ट मीटर बसवण्याचा आग्रह केला जात असल्याचे निदर्शनास येत आहे.
संबंधित कर्मचारी वीज ग्राहकांच्या दारोदारी जाऊन वीज ग्राहकांना तुम्ही वीज वितरण महामंडळाकडे स्मार्ट मीटर बसवण्याविषयी अर्ज करावे अशी विनवणी ते करीत आहेत. याबाबत वीज ग्राहकांमधून तीव्र नाराजीचा सूर उमटत असून स्मार्ट मीटर माथी मारण्याचा हा एक कुटील डाव असल्याचे मत वीज ग्राहकांकडून व्यक्त होत आहे. स्मार्ट मीटर वेळेत न बसवल्यास शासन भविष्यात यावरती सक्ती करेल व नाहक तुम्हाला आर्थिक भुर्दंड बसेल अशी दिशाभूल ते करून स्मार्ट मीटर बसवण्यास भाग पाडत आहेत.
मुळात स्मार्ट मीटर हे एक डिजिटल उपकरण आहे. अनेकदा या उपकरणात तांत्रिक बिघाड होत असल्याचे वीज ग्राहकांचे म्हणणे आहे. परिणामी स्मार्ट मीटर बसवण्याबाबत वीज ग्राहक उदासीन आहेत. परंतु खाजगी कंपनीचे कर्मचारी मात्र वीज ग्राहकांना स्मार्ट मीटर चे फायदे व महत्त्व याबाबत माहिती देताना दिसून येत आहे. सध्या राज्यात पाच विविध खाजगी कंपन्यांना स्मार्ट मीटर बसवण्याचा ठेका राज्य सरकारने दिला आहे त्यामुळे खाजगी कंपनीचे कर्मचारी वीज ग्राहकांच्या दारोदारी जाऊन स्मार्ट मीटर बसवण्याबाबत दबाव वाढवत आहेत.
सातारा शहरात विविध भागातील अनेक ठिकाणी स्मार्ट मीटर बसवण्यात आले आहेत. विजेची अचूक नोंदणी या माध्यमातून होत असल्याचे स्मार्ट मीटर बसवणाऱ्या कंपनीचे मत आहे. यामुळे मॅन्युअल रिडींग ची गरज भासत नाही. स्मार्ट मीटर बाबत वीज ग्राहकांमध्ये संभ्रम अवस्था आहे. स्मार्ट मीटर बसवल्यास विजेची बिल अधिक येईल अशी भीती वीज ग्राहकांच्या मनात आहे. संबंधित यंत्रणेने वीज ग्राहकांच्या अडचणी समस्या समजून घेणे गरजेचे आहे. सक्तीने अथवा दबावाने स्मार्ट मीटर बसवणे हे चुकीचे आहे.