सातारा : राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे हे दोन दिवस सातारा जिल्ह्याच्या दौर्यावर आले आहेत. त्यांचे सातारा शहरातील बॉम्बे रेस्टॉरंट चौक येथे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्यासह शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रणजितसिंह भोसले आणि पदाधिकार्यांनी जल्लोषात स्वागत केले. यावेळी जोरदार फटाक्यांची आतषबाजी व तुफान घोषणाबाजी करण्यात आली.
ना. एकनाथ शिंदे हे दोन दिवस जिल्हयात मुक्कामी आले आहेत. दरे, ता. महाबळेश्वर या निवासस्थानी ते मुक्कामी असणार आहेत. शुक्रवारी दुपारी ते पुण्याहून सातारा शहरात आले. बॉंम्बे रेस्टोरंट येथे कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्वागताची जंगी तयारी केली होती. पालकमंत्री ना. शंभूराज देसाई, जिल्हा प्रमुख रणजितसिंह भोसले, चंद्रकांत जाधव, महिला प्रमुख शारदा जाधव, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष संभाजी पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
तेथून उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या कोयना दौलत या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. त्यावेळी जिल्हा प्रशासनाच्यावतीने पालकमंत्री ना. शंभूराज देसाई, जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, प्रांताधिकारी, पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्यासह पदाधिकार्यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर ते कास मार्गे दरे गावी रवाना झाले.
बामणोली पर्यंत जिल्हाप्रमुख रणजितसिंह भोसले हे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याबरोबरच होते. मात्र, बामणोलीत पोहोचल्यानंतर तेथे सुरु असलेल्या मुसळधार पावसाने व्यत्यय आणला आणि उपमुख्यमंत्र्यांचा ताफा काही काळ तेथेच थांबला. त्यानंतर पाऊस ओसरल्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे हे त्यांच्या दरे गावी बोटीने रवाना झाले.