सातारारोड : खंडाळा- शिरोळ या मार्गाचा भाग असलेल्या पिंपोडे खुर्द ते कोरेगाव या रस्त्याच्या कामामुळे निर्माण झालेल्या समस्यांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काल स्वातंत्र्यदिनी एकत्र येत सातारा-लोणंद मार्गावर पिंपोडे खुर्द (ता. कोरेगाव) येथे रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी शिवसेना व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला. या वेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, तालुकाध्यक्ष घनश्याम शिंदे, राजाभाऊ जगदाळे, तेजस शिंदे, साहिल शिंदे, शिवसेनेचे दिनेश बर्गे, कल्याण भोसले, ॲड. पांडुरंग भोसले, जयवंत घोरपडे, दिलीप अहिरेकर, अमोल राशीनकर, नाना भिलारे, नीलेश जगदाळे, राजेंद्र कदम, विकास कदम, सुधीर फाळके आदींनी प्रश्नांची सरबत्ती केली.
रस्त्याच्या एका बाजूला काम करताना दुसऱ्या बाजूने वाहतूक सुरू ठेवली पाहिजे, मात्र, इथे काय चालले आहे? एकाच वेळी १५-२० किलोमीटर रस्ता खोदून ठेवला आहे, डायवर्शनचे बोर्ड लावले नाहीत, त्यामुळे अपघात होत आहेत, जवळपास ५० लोकांचे हातपाय मोडले आहेत. त्यांना भरपाई देणार का? असे प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आले. पावसामुळे कामाला विलंब होत असून, कंत्राटदाराला दंडाबाबतची नोटीस काढली असल्याचे श्री. राऊत यांनी सांगितले. या रस्त्याचे अंदाजपत्रक किती आहे? या प्रश्नावर उत्तर देताना १४२ कोटींचे अंदाजपत्रक असल्याची माहिती श्री. राऊत यांनी दिली. त्यावर आंदोलक संतप्त झाले आणि दीडशे कोटींचे, मग पाचशे कोटींचा बोर्ड कसा? असा सवाल उपस्थित केला.
सुनील माने म्हणाले, ‘‘महाविकास आघाडीचे सरकार असताना राज्याला ‘एडीबी’कडून पाच हजार कोटी आले होते. त्यातून त्यावेळी खंडाळा-शिरोळ या मार्गाच्या पूर्ण लांबीच्या कामासाठी आम्ही ५०० कोटींचा निधी मंजूर करून घेतला होता. त्यानंतर या सरकारने नवीन कामे सुरू केली. त्यात या मार्गाची लांबी कमी केली आणि आता या रस्त्याची ही अशी अवस्था करून ठेवली आहे.’’ लोकांच्या गैरसोयी दूर न केल्यास तीव्र आंदोलनाला सामोरे जावे, असा इशारा या वेळी आंदोलकांनी दिला. आंदोलनात देऊर, बिचुकले, पळशी, पिंपोडे खुर्द, अंबवडे संमत वाघोली, कोलवडी, रेवडी, सातारारोड, जळगाव, भाकरवाडी, कोरेगाव येथील काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व समविचारी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.
रास्ता रोकोमुळे वाहतूक ठप्प झाली होती. मात्र, सातारा बाजूकडून आलेल्या रुग्णवाहिकेसाठी आंदोलकांनी रस्ता मोकळा करून दिला आणि अडथळा न होता ही रुग्णवाहिका पुढे निघून गेली. दरम्यान, आंदोलनाचा एक भाग म्हणून कोलवडी येथील एका कार्यकर्त्याने ‘सरकारकडे पैसे नाहीत, सरकारला मदत करा,’ असे म्हणत आंदोलनस्थळी उपस्थितांकडे प्रतिकात्मक भीक मागून सरकारचा निषेध केला.