सातारा : शाहूपुरी चौकालगत असलेल्या रेणुका सर्व्हिस सेंटर परिसरात अल्पवयीन युवकावर शस्त्राचा धाक दाखवत मारहाण करून त्याच्याकडील सोन्याचे दागिने लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी माजगावकर माळ झोपडपट्टीतील सात जणांवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
राज वैराट, अजय बागल, आदित्य वाघमारे, सनी मोहिते, आयुष भोसले, सोमा जावळे आणि रुद्र अवघडे अशी गुन्हा दाखल असलेल्या संशयितांची नावे आहेत. अल्पवयीन युवक शुक्रवार पेठेत कुटुंबासह वास्तव्यास असून, तो शुक्रवारी दुपारी सुमारास शाहूपुरी चौकालगतच्या रेणुका सर्व्हिस सेंटर येथे थांबला होता.
या वेळी राज वैराट हा आपल्या साथीदारांसह तिकडून जात असताना अल्पवयीनाने त्याच्याकडे पाहिल्याचे पाहून रागाच्या भरात वैराट त्या ठिकाणी आला आणि अल्पवयीनास मारहाण केली. त्याने कानात असलेली सोन्याची बाली हिसकावली. त्यानंतर वैराटच्या साथीदारांनी लाकडी दांडके, कोयता आणि तलवारीचा धाक दाखवत मारहाण केली. मारहाणीदरम्यान त्यांनी अल्पवयीनाच्या गळ्यातील सुमारे दोन तोळे वजनाची, किंमत ४५ हजार रुपये असलेली सोन्याची साखळी हिसकावली.
यानंतर हातातील शस्त्रांचा धाक दाखवत संशयितांनी धमकावत पळ काढला. मात्र, रात्रीच्या सुमारास राज वैराट हा पुन्हा साथीदारांसह अल्पवयीनाच्या घरासमोर आला आणि शिवीगाळ करत तलवार, कोयत्याने दुचाकीसह इतर वाहनांची तोडफोड केली.
घटनेची तक्रार अल्पवयीनाने शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल केली असून, संशयितांविरुद्ध गंभीर कलमांखाली गुन्हा नोंदविण्यात आला आहे. उपअधीक्षक राजीव नवले आणि पोलिस निरीक्षक एस. जी. म्हेत्रे यांनी घटनास्थळाची पाहणी करून संशयितांच्या अटकेसाठी सूचना दिल्या आहेत.