सातारा : पुण्यातील दिग्विजय प्रतिष्ठान संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘शिवचरित्र प्रसार अश्वमोहीम’चे रविवारी साताऱ्यात उत्साहात स्वागत करण्यात आले. गेली २५ वर्षे इक्वेस्ट्रीयन हॉर्स रायडिंगचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेचे संचालक श्री. गुणेश पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही अनोखी मोहीम राबविण्यात येत आहे.
या मोहिमेची सुरुवात १७ एप्रिल रोजी ऐतिहासिक शिवनेरी किल्ल्यावरून झाली असून १० मे रोजी रायगड येथे समारोप होणार आहे. महाराष्ट्रातील २५ किल्ल्यांना अश्वारोहण करत भेट देत शिवचरित्राचा प्रसार आणि तरुणांमध्ये इतिहासाबद्दल जागरूकता निर्माण करणे हा मोहिमेचा उद्देश आहे.
रविवारी सकाळी अश्वारोहक साताऱ्यात दाखल झाले. ऐतिहासिक शाहूनगरीत त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. जलमंदिर पॅलेस येथे राजमाता कल्पनाराजे भोसले यांच्या हस्ते स्वागत सोहळा पार पडला. यावेळी भाजपा सातारा जिल्हा लोकसभा संयोजक सुनीलतात्या काटकर, सातारा नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष डी. जी. बनकर, नगरसेवक पंकज चव्हाण यांच्यासह मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.