सहकारमहर्षी; भाऊसाहेब महाराज

by Team Satara Today | published on : 15 May 2025


ऐतिहासिक सातारा म्हटलं की डोळ्यासमोर उभा राहतो तो किल्ले अजिंक्यतारा आणि छत्रपतींची राजधानी! छत्रपती शिवरायांच्या राजघराण्याचा समाजकारणाचा, समाजसेवेचा आदर्श आणि समर्थ वारसा चालवणाऱ्या या राजघराण्याचा शिवरायांचे वंशज श्रीमंत छ. अभयसिंहराजे भोसले यांनी आपल्या अलौकिक कार्यकर्तृत्वाने नावलौकिक वाढवला. छत्रपती घराण्याचा समाजसेवेचा वारसा जोमाने पुढे नेणाऱ्या स्व.अभयसिंहराजे भोसले उर्फ भाऊसाहेब महाराज यांनी सातारा तालुक्याची ओळख जिल्ह्याच्या आणि महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय पटलावर करून दिली. 'विना सहकार नाही उद्धार' हे ब्रीद अंमलात आणून सातारा तालुक्याचा कायापालट करणाऱ्या स्व. भाऊसाहेब महाराजांना सातारा तालुक्याचे भाग्यविधाते म्हणून ओळखले जाते. 

छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे तमाम मराठी मनाची अस्मिता आणि अवघ्या महाराष्ट्राचे आराध्यदैवत. 

याच शिवरायांच्या ऐतिहासिक आणि वंदनीय घराण्यात भाऊसाहेब महाराजांचा १६ मे १९४४ रोजी जन्म झाला. त्यांचे वडील, म्हणजेच तिसरे शाहू महाराज लष्करात असल्यामुळं शिस्तप्रिय वातावरणातच अभयसिंहराजे लहानाचे मोठे झाले. राजघराण्यातील असलो, तरी आपण एक माणूस आहोत, या अमूल्य भावनेतून संपूर्ण जीवन जगताना भाऊसाहेब महाराजांनी अहोरात्र समाजासाठी कष्ट उपसले. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी या उक्तीप्रमाणे जीवन जगत भाऊसाहेब महाराजांनी समाजातील तळागाळातील लोकांसाठी आपले जीवन समर्पित केले. केवळ राजघराण्यात जन्म घेतला म्हणून माणूस मोठा होत नाही, तर त्याच्या कार्यकर्तृत्वाने तो मोठा होतो, हे भाऊसाहेब महाराज यांनी आपल्या अजोड कार्यकर्तृत्वाने दाखवून दिले आहे. सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या सातारा तालुक्याची अवहेलना होत असताना भाऊसाहेब महाराज यांच्या रूपाने तालुक्याला एक उमदे आणि सक्षम नेतृत्व लाभले आणि सातारा तालुक्याचे नाव राज्याच्या राजकारणात आदराने घेतले जावू लागले. या तालुक्याचे नेतृत्व करताना स्व. भाऊसाहेब महाराजांनी सहकार क्रांती घडवली आणि सातारा तालुक्यातील गोर-गरीब, शेतकऱ्यांना आर्थिक सुबत्त करतानाच तालुक्याचा सर्वांगीण विकास साधला.

भाऊसाहेब महाराज समाजकारण आणि राजकारणात सक्रिय झालेले छत्रपतींच्या घराण्यातले पहिले नेते. राजघराण्यातल्या व्यक्तींचं शिक्षण सामान्यतः मुंबई, डेहराडूनमधल्या महागड्या शाळांमध्ये किंवा खास शिक्षक नेमून होत असे. भाऊसाहेब महाराज त्याला अपवाद होते. सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातल्या व्यक्तीप्रमाणंच त्यांचा जीवनपट आपल्याला दिसतो. राजघराण्यातलं ऐश्वर्याचं जीवन न जगता त्यांनी शेतीत लक्ष घातलं. शेतीत वेगवेगळे प्रयोग करणं, नवनवीन तंत्र वापरणं, शेतीशी निगडित उद्योगधंदे करणं, याची त्यांना आवड होती. शेतीच्या निमित्तानं ते गोरगरीब जनतेत मिसळले. लोकांना हवेहवेसे वाटू लागले.                

१९७८ मध्ये जनता पक्षाचे उमेदवार म्हणून त्यांनी राजकारणात प्रवेश केला. तेव्हापासूनचा २६ वर्षांचा त्यांचा जीवनपट कोणत्याही लोकप्रतिनिधीला आदर्शवत् ठरावा असाच आहे. सहा वेळा विधानसभा आणि एकदा लोकसभेची निवडणूक त्यांनी लढवली आणि प्रत्येक वेळी निवडून आले. अजिंक्यताऱ्याच्या मुशीत घडलेले भाऊसाहेब महाराज राजकारणात सदैव अजिंक्यच राहिले. सातारा तालुका आणि जिल्हाच नव्हे तर राज्याच्या राजकारणावर त्यांचा प्रभाव दिसून आला. राजकीय कारकिर्दीतील २६ वर्षांत राजकारण, समाजकारण, अर्थकारण आणि सहकार क्षेत्रावर त्यांच्या कर्तृत्वाची मोहर उमटली. सातारा तालुक्यातल्या अतिदुर्गम गावापर्यंत ते पोहोचले. लहान-सहान खेड्यांमध्ये शाळा, रस्ते, पाणीपुरवठ्याच्या सोयी पोहोचवण्यासाठी त्यांनी स्वतः धडपड केली.

सर्वसामान्यांच्या समस्यांची जाण, विकासकामांमुळं प्रभावित झालेली जनता आणि सर्व जातिधर्माच्या व्यक्तींशी समानतेचा व्यवहार या बाबींनी भाऊसाहेब महाराजांना राजकीय जीवनात केवळ यश आणि यशच दिलं. राजकीय वाटचालीबरोबरच विविध संस्थांची उभारणी करून त्यांनी असंख्य व्यक्तींना रोजगार मिळवून दिला, हेही त्यांच्या लोकप्रियतेचं प्रमुख कारण होय. राजकारणात नवख्या असलेल्या भाऊसाहेब महाराजांनी १९७८ मध्ये विधानसभेचं मैदान मारलं आणि नंतर मागे वळून पाहिलंच नाही. ही विधानसभा दोनच वर्षं टिकली. नंतर ते काँग्रेसच्या तिकिटावर १९८० मध्ये पुन्हा विधानसभेवर निवडून गेले. बॅरिस्टर अंतुले यांच्या मंत्रिमंडळात गृह, कृषी, पाणीपुरवठा आणि ग्रामीण विकास खात्याचे राज्यमंत्री म्हणून त्यांचा समावेश झाला. १९८३ मध्ये ते सहकार राज्यमंत्री झाले. १९८५ च्या निवडणुकीत पुन्हा विजयी झाल्यानंतर प्रशासन आणि बांधकाम खात्याचं राज्यमंत्रिपद त्यांना मिळालं. १९८८ मध्ये कॅबिनेट दर्जाचं मंत्रिपद त्यांना प्रथम मिळालं आणि सहकार क्षेत्रातली त्यांची जाण लक्षात घेऊन सहकार खातं त्यांना देण्यात आलं. या माध्यमातून त्यांनी राज्यभरात अनेक सहकारी संस्थांचे जाळे विणले. आमदार आणि मंत्रिपदाच्या माध्यमातून १९९० पर्यंत त्यांनी मतदारसंघाचा कायापालट घडवून आणला होता. त्याचा परिणाम म्हणून १९९० च्या निवडणुकीतही ते मोठ्या फरकानं विजयी झाले आणि मंत्रिमंडळात ग्रामीण विकास खात्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांचा समावेश झाला. पदांचा उपयोग सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी केल्यामुळं भाऊसाहेब महाराजांची लोकप्रियता आणि मताधिक्यही वाढतच गेलं. १९९५ मध्ये पुन्हा एकदा त्यांनी बाजी मारली. १९९८ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून भाऊसाहेब महाराजांना उमेदवारी दिली गेली आणि १ लाख ८१ हजारांहून अधिक मताधिक्यानं ते विजयीही झाले. १९९९ मध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काँग्रेसचा त्याग करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली आणि भाऊसाहेब महाराजांनी त्यांना साथ दिली. त्यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीतही ते विजयी झाले.

सहकार क्षेत्रात त्यांनी स्थापन केलेला अजिंक्य उद्योगसमूह नावाप्रमाणंच अजिंक्य ठरला. ग्रामीण भागातील जनतेला आणि प्रामुख्याने शेतकऱ्यांना आर्थिक सक्षम करण्याच्या उद्देशाने त्यांनी अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना उभारला. पुढे सूत गिरणीची उभारणी त्यांनी केली. त्यांनी अनेक योजना राबवल्या. सुधारित बियाणं, बियाण्यांसाठी प्लॉट, मागासवर्गीय सभासदांना शासकीय सवलतींचा लाभ, पूर्व मशागतीची कामं सवलतीच्या दरात करून देणं अशा कामांबरोबरच भाऊसाहेब महाराजांनी या परिसरात सहकारी तत्त्वावरच्या १८ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित केल्या. अनेक ठिकाणी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधले गेले. उरमोडी नदीवर उरमोडी धरणाची निर्मिती करून भाऊसाहेब महाराजांनी सह्कारक्रांती बरोबरच जलक्रांतीही घडवून आणली.

सहकाराच्या माध्यमातून सामूहिक विकासाची दिशा समाजाला देतानाच भाऊसाहेब महाराजांनी सातारा शहर, तालुका आणि जिल्ह्यात विविध विकासकामांना गती दिली. गावोगावी समाजमंदिरं, रस्ते, पूल, पाणीपुरवठा योजना, लोकांना एकत्र येण्यासाठी सामाजिक सभागृहं, कलागुणांच्या विकासासाठी सांस्कृतिक भवनं, वाचनसंस्कृती वाढवण्यासाठी वाचनालयं, सक्षम युवा पिढी घडवण्यासाठी व्यायामशाळा, शेतीच्या विकासासाठी जलसिंचन प्रकल्प, बंधारे, सातारा शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी कास योजनेत सुधारणा, शहरात विविध ठिकाणी साठवण टाक्या, शहापूर योजना, शहरात विविध उद्यानांची निर्मिती, ऐतिहासिक स्मृतिस्थळांचा विकास, तळ्यांची सफाई आणि सुशोभीकरण, पालिका प्रशासकीय इमारत, शॉपिंग कॉम्प्लेक्स, जलतरण तलाव, भाजी मंडईचा विकास, आरोग्यविषयक सोयीसुविधा, कचरा व्यवस्थापन, शैक्षणिक प्रगतीला हातभार, क्रीडासंस्कृतीचा विकास असं डोंगराएवढं काम आज भाऊसाहेब महाराजांच्या दूरदृष्टीची आणि समाजाप्रती असलेल्या तळमळीची साक्ष देत उभं आहे. साहित्यक्षेत्राच्या विकासातही त्यांचं मोलाचं योगदान आहे.

मिळालेल्या पदांचा लोकांसाठी आणि सामूहिक विकासासाठी उपयोग कसा करून घ्यावा, लोकांना विकासाच्या प्रक्रियेत सहभागी कसं करून घ्यावं आणि सामाजिक सलोखा कसा टिकवावा, याचा आदर्श वस्तुपाठ म्हणजे भाऊसाहेब महाराजांचा जीवनपट! विकासवाटेवरचा हा प्रदीर्घ प्रवास आणखीही बरीच वर्षं सुरू राहील, असं वाटत असतानाच ४ फेब्रुवारी २००४ चा तो काळा दिवस उजाडला. सातारा शहर आणि तालुक्याच्या जनतेला हवंहवंसं वाटणारं व्यक्तिमत्त्व.., राजघराण्यात जन्म घेऊनसुद्धा सातत्यानं सामान्यांच्यात रमणारं व्यक्तिमत्त्व.., आपल्या सगळ्यांचे लाडके भाऊसाहेब महाराज यांना त्या दिवशी नियतीनं आपल्यातून हिरावून नेलं. घराघरात सुखासमाधानाचा दीप प्रज्वलित करण्यासाठी अहोरात्र कष्ट  घेणारे भाऊसाहेब महाराज आज आपल्यात नाहीत, हे पटतसुद्धा नाही. कारण पावलापावलावर त्यांच्या पाऊलखुणा आहेत... आपल्या आसपास... साताऱ्याच्या कणाकणात आणि सातारकरांच्या मनामनात भाऊसाहेब महाराज आहेत... त्यांनी चेतवलेला विकासयज्ञ त्यांचे पुत्र नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जोमानं पुढं सुरू ठेवला आहे. सर्वसामान्य माणसाला बारा हत्तींचं बळ देणारे भाऊसाहेब महाराज अनेक रूपांनी आजही आपल्यात आहेत... यापुढंही राहतील! सातारा तालुक्याचे भाग्यविधाते, सहकारमहर्षी भाऊसाहेब महाराज आपल्याला कायम समाजसेवेची प्रेरणा देत राहतील. त्यांच्या आदर्श विचारांच्या वाटेवरून समाजहितासाठी आपण अखंडपणे चालत राहू. जयंतीनिमित्त भाग्यविधाते भाऊसाहेब महाराज यांच्या पावन स्मृतींना विनम्र अभिवादन!

अमर मोकाशी, वरिष्ठ पत्रकार

७३५००१०३०३


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कायम तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी सकाळी उठल्यानंतर फॉलो करा 'या' सोप्या टिप्स
पुढील बातमी
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार

संबंधित बातम्या