भुईंज : लग्न करून 15 दिवसच झाले होते. अंगाची नीट हळदही निघाली नव्हती, तोच नियतीने घात केला. नवरदेव लग्नासाठी घेतलेल्या सुट्टीनंतर पुन्हा कामावर हजर व्हायला निघाला. मात्र, पुण्याला जात असताना महामार्गावर खंबाटकी बोगदा परिसरात दुचाकीचा भीषण अपघात झाला अन् नवरदेवावर काळाने झडप घातली. या हृदयद्रावक घटनेने शेणोली गाव व परिसर हळहळला. विकास आनंदराव गुणवंत (वय 34, रा. शेणोली, ता. कराड) असे या नवरदेवाचे नाव आहे. त्यांचे 15 दिवसांपूर्वी लग्न झाले होते.
विकास गुणवंत हे पुणे येथे खासगी कंपनीत कामाला होते. शेणोली येथे 15 दिवसांपूर्वी त्यांचे लग्न झाले. लग्न झाल्यानंतर ते शुक्रवारी पुणे येथे कंपनीत कामावर पुन्हा रुजू होण्यासाठी दुचाकीवरून निघाले होते. शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास खंबाटकी बोगद्यात कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये ते गंभीर झाले. या घटनेची माहिती प्रवाशांनी पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर गुणवंत यांना उपचारासाठी कवठे आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र, त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची भुईंज पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.