भिलार येथे ‘अभिजात मराठी भाषा गौरव दिन’ उत्साहात; ‘यशदा’च्या प्रशिक्षणार्थी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केली काव्यरूपी कृतज्ञता

by Team Satara Today | published on : 28 February 2026


सातारा : ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कविवर्य वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिन आणि 'अभिजात मराठी भाषा गौरव दिना'चे औचित्य साधून, राज्य मराठी विकास संस्थेच्या 'पुस्तकांचे गाव' भिलार येथील प्रकल्प कार्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे यशवंतराव चव्हाण प्रशासन विकास प्रबोधिनी (यशदा), पुणे येथील ४४ प्रशिक्षणार्थी वैद्यकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती आणि त्यांनी केलेले बहारदार काव्यवाचन.

भिलार हे पुस्तकाचे गाव देशातील पहिले पुस्तकाचे गाव म्हणून जाहीर झाल्यापासून प्रत्येक वर्षी मराठी अनेक आयोजित केले जातात आजचा कार्यक्रम आताच एक भाग म्हणून आयोजित करण्यात आला

काव्यवाचनातून मराठीला वंदन

क्षेत्रभेटीच्या निमित्ताने भिलारमध्ये आलेल्या या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केवळ प्रेक्षक न राहता, स्वतः विविध कवितांचे सादरीकरण करून मराठी भाषेप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली. काव्यवाचन करणाऱ्या सर्व डॉक्टरांना 'यशदा'चे उप-संचालक मा. श्री. मंगेश जोशी (भा.प्र.से.) यांच्या हस्ते पुस्तके देऊन गौरविण्यात आले.

मराठीच्या अभिमानाची पदयात्रा

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात सर्व वैद्यकीय अधिकारी आणि प्रकल्प कर्मचाऱ्यांनी प्रकल्प कार्यालयापासून जिल्हा परिषद केंद्र शाळेपर्यंत पदयात्रा काढली. या पदयात्रेने भिलार परिसरातील वातावरण मराठीमय झाले होते. केंद्र शाळेतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास मा. श्री. मंगेश जोशी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

मान्यवरांची उपस्थिती

या प्रसंगी 'यशदा'च्या सत्र-संचालिका स्वाती कुलकर्णी, उप-संचालक श्री. मंगेश जोशी (भा.प्र.से.), प्रकल्प कार्यालयातील कर्मचारी आणि प्रशिक्षणार्थी डॉक्टर उपस्थित होते. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन श्री. राजेश जाधव यांनी केले, तर कार्यक्रमाची संपूर्ण आखणी व मांडणी श्री. बालाजी हाळदे यांनी केली होती. शेवटी श्रीमती उमा शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले. महाराष्ट्र गीताच्या गायनाने या सोहळ्याची सांगता झाली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कुसुमाग्रजांच्या कवितेप्रमाणे विद्यार्थ्यांनी मराठी भाषेचा "कणा" व्हावे: यशेंद्र क्षीरसागर ; भुरकवडी शाळेत मराठी भाषा दिनानिमित्त विद्यार्थ्यांशी संवाद
पुढील बातमी
नगरसेवक विश्वतेज बालगुडे यांच्या पुढाकारातून गणराया कॉलनीमधील प्रश्न मार्गी; गणराया वाचनालयाच्या जागेसंदर्भात सर्वमान्य तोडगा

संबंधित बातम्या