राष्ट्रवादी अजितदादा गटाची जिल्ह्यात पक्ष बांधणी सुरू

नवीन पदाधिकार्‍यांच्या निवडी जाहीर; महायुतीच्या सूचनेप्रमाणे आगामी निवडणुका लढणार : खासदार नितीन काका पाटील

सातारा : राष्ट्रवादी अजितदादा गट सातारा जिल्ह्यात पक्ष बांधणीसाठी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सक्रिय झाला आहे. खासदार नितीन काका पाटील यांनी शिर्डी येथील अधिवेशनानंतर प्रथमच जिल्ह्यात रखडलेल्या पदाधिकार्‍यांच्या निवडी जाहीर केल्या. यामध्ये जिल्हा कार्याध्यक्षपदी संजय देसाई, युवा राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षपदी पप्पूराज गोडसे, फलटण तालुका विधानसभा अध्यक्षपदी शिवरूपराजे खर्डेकर, माण-खटाव विधानसभा अध्यक्षपदी युवराज सूर्यवंशी यांची वर्णी लागली आहे.

उर्वरित निवडी या संसदेच्या अंदाजपत्रक सत्रानंतर पुन्हा जाहीर करण्यात येतील, असे नितीन काका पाटील यांनी जाहीर केले. तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांच्या निर्देशाप्रमाणे लढवण्यात येतील, अशीही स्पष्ट ग्वाही खासदार नितीन काका यांनी दिली. राष्ट्रवादी भवनाच्या दालनामध्ये नूतन पदाधिकार्‍यांच्या निवडी आणि संवादमेळाव्यानंतर नितीन पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर, फलटण विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन कांबळे पाटील तसेच राष्ट्रवादी कार्यकारिणीचे पदाधिकारी उपस्थित होते.

नितीन काका पाटील पुढे म्हणाले, राष्ट्रवादी अध्यक्ष अजित दादा पवार यांनी शिर्डी येथे झालेल्या अधिवेशनामध्ये पक्ष बांधणीचे निर्देश दिले असून पक्ष संघटना प्रत्येक जिल्ह्यात मजबूत करण्यासाठी सदस्य नोंदणी अभियान सुरू केले आहे. याशिवाय लोकांमध्ये जाऊन बूथरचना मजबूत करणे, राज्य शासनाच्या कल्याणकारी योजनांचा प्रसार प्रचार करणे याबाबतचे निर्देश प्राप्त झाले आहेत. त्यादृष्टीने रखडलेल्या काही पदाधिकार्‍यांच्या निवडी आम्ही जाहीर केल्या आहेत. राष्ट्रवादी जिल्हा कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी कराडचे संजय देसाई, फलटण तालुक्याची जबाबदारी शिवरूपराजे खर्डेकर, माण तालुक्याची जबाबदारी युवराज सूर्यवंशी, तर युवा राष्ट्रवादी संघटनेची जबाबदारी पप्पूराज गोडसे यांना देण्यात आली आहे. या पक्ष बांधणीबाबत बोलताना नितीन काका पुढे म्हणाले, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या निवडी केल्या जात आहेत. अजूनही काही निवडी बाकी आहेत. त्या निवडींना केंद्र शासनाच्या संसदीय अधिवेशनानंतर जाहीर केले जाईल.

फलटणचे आमदार सचिन कांबळे पाटील हे केवळ तांत्रिकदृष्ट्या राष्ट्रवादीचे आमदार आहेत का ? याबाबत पत्रकारांनी छेडले असता नितीन काका म्हणाले, त्यांचा पक्षप्रवेश राष्ट्रवादीत झाला आहे. तसेच येथील तालुक्यात शिवरूपराजे खर्डेकर यांचे तालुकाध्यक्षपदी नाव त्यांनीच अजितदादा यांना सुचवले आहे. त्यानुसार या निवडी झाल्या आहेत. रामराजे व शिवरूपराजे यांच्यात राजकीय मतभेद सध्या सुरू आहेत. मात्र देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादीच्या बैठकीत रामराजे पहिल्या रांगेत होते व इकडे फलटण तालुक्यात राष्ट्रवादीची जबाबदारी शिवरूपराजे यांच्याकडे देण्यात आली आहे. या राजकीय  संदर्भाने राष्ट्रवादीत दोन गट आहेत काय, या प्रश्नावर बोलताना नितीन काका म्हणाले, राष्ट्रवादी ही एकसंघ आहे. काही राजकीय विषय हे धोरणात्मक पातळीवरचे आहेत. त्या दृष्टीने अजित दादांनी निर्णय घेतलेला आहे.

तसेच फलटण तालुक्यामध्ये शिवरूपराजे खर्डेकर यांच्याकडे राष्ट्रवादीची जबाबदारी देण्यात आली आहे. जे निर्णय पक्षश्रेष्ठींनी घेतलेले आहेत, त्यामागे राजकीय समीकरणांचा अभ्यास आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला उमेदवार मिळणार काय, या प्रश्नावर सुद्धा नितीन काका म्हणाले, राष्ट्रवादीची फळी मजबूत आहे. प्रत्येक तालुक्यामध्ये स्थानिक परिस्थिती पाहून त्या पद्धतीने महायुतीच्या तिन्ही नेत्यांकडून ज्याप्रमाणे निर्देश येतील, त्या पद्धतीने निवडणुका लढवल्या जातील.

जिल्हा बँकेच्या एका संचालिकांनी पालकमंत्री पदासाठी शंभूराज देसाई यांना विरोध करुन शिवेंद्रराजे यांना पाठिंबा व्यक्त केला होता, याबाबत पाटील यांना छेडले असता मी तेव्हा सातार्‍यात नव्हतो, दिल्लीतील एका बैठकीत होतो. मात्र, संबंधित संचालिका या शिवेंद्रराजे यांच्या कट्टर समर्थक आहेत. मात्र, महायुतीमधील जिल्ह्यातील चौघांपैकी कोणातरी एकाकडे पालकमंत्री पदाची माळ येणार होती, ती शंभूराज देसाई यांच्याकडे आली आणि त्याचे समर्थन स्वत: शिवेंद्रराजे यांनी केले असल्याचे पाटील यांनी सांगितले.



मागील बातमी
शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी एकावर गुन्हा
पुढील बातमी
ॲग्रीस्टॅक उपक्रमांतर्गत शेतकरी ओळख क्रमांक निर्माण केले जाणार

संबंधित बातम्या