मुंबई : राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मराठी भाषा, औरंगजेब कबर, मशिदींवरली भोंगे. नद्यांमधील प्रदूषण यासह अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चांगलं राज्य मिळालं असून ते योग्य प्रकारे चालवावं असा सल्लाही दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधतना राज ठाकरेंनी मांडलेल्या मुद्द्यांवर भाष्य केलं.
"राज्य चांगलं चालवण्याचा आमचा प्रयत्न आहे. राज्य चालवताना सर्वांची मदत आणि विश्वासात घेऊन राज्य चालवण्याचा आमचा प्रयत्न आहे. राज्य चालवताना सर्वांना सोबत घेऊन चालवणे हे आमचं उद्दिष्ट आहे," असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. मशिदीवरील भोंग्यांसंदर्भात विचारण्यात आलं असता ते म्हणाले, 100 टक्के जे नियमाच्या बाहेर असतील आणि सुप्रीम कोर्टांचा जो आदेश आहे या आदेशाचे तंतोतंत पालन महाराष्ट्र सरकार करेल.
राज ठाकरेंनी औरगंजेबाच्या कबरीसंदर्भात मांडलेल्या भूमिकेवर ते म्हणाले, "ही जी कबर आहे तिला एएसआयचं संरक्षण आहे. आम्हाला औरंगजेब आवडो ना आवडो, कायद्याने 50-60 वर्षांपूर्वी त्या कबरीला संरक्षण दिलं आहे. म्हणून त्या ठिकाणी कायद्याचं पालन करणं आमची जबाबदारी आहे. पण कुठल्याही परिस्थितीत औरंगजेबाच्या कबरीचं उदात्तीकरण होऊ देणार नाही".
राज ठाकरेंनी यावेळी बँकेत मराठी भाषा वापरली जाईल याची खात्री करण्याचा आदेश मनसैनिकांना दिला आहे. मराठी माणूस सध्या असुरक्षित आहे. आमच्या राज्यात येऊन आम्हाला सांगणार असाल की मराठी बोलणार नाही, कानफाट फोडेन त्यांचं. उद्यापासून बँकांमध्ये जाऊन मराठी कारभार होत आहे का हे बघा. नसेल तर त्यांना करायला लावा असा आदेश राज ठाकरेनी दिला आहे. त्यावर फडणवीस म्हणाले की, "ज्या ठिकाणी मराठी वापरणं आवश्यक आहे, तिथे मराठी वापरली गेली पाहिजे हा आग्रह असणं चुकीचं नाही. पण त्यासाठी जर कोणी कायदा हातात घेणं चुकीचं ठरेलं. कायदा हातात घेणार नाही अशी आशा आहे".
नद्यांच्या मुद्द्यावर ते म्हणाले की, "महाराष्ट्रातील नद्या निर्मळ झाल्या पाहिजे असा आमचा प्रयत्न आहे. त्याकरिता काही मिशन आम्ही हातात घेतले आहे. हे तात्काळ स्वरूपात होणारी कामे नाही. हा खूप मोठा कार्यक्रम आहे. थोडा वेळ खाणारा आणि खर्चिक कार्यक्रम आहे. मात्र हा केलाच गेला पाहिजे या मताचे आम्ही असल्यामुळे त्याची सुरुवात आम्ही केली आहे. यावेळी आपला कुंभमेळावा होईल त्यावेळी पवित्र गोदावरी नदीत लोक स्नान करतील त्यावेळी त्यांना स्वच्छ पाण्याचा अनुभव कसा देता येईल हा आमचा प्रयत्न राहील".