कोरेगाव : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाचे मूळ सूत्रधार शोधावेत. या खून प्रकरणातून सुटका झालेल्या तिघांविषयी उच्च न्यायालयात दाद मागावी. जादूटोणाविरोधी कायदा देशभरात लागू करावा, अशा मागण्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कोरेगाव शाखेने केल्या आहेत. याबाबत आज डॉ. दाभोलकरांच्या बाराव्या स्मृतिदिनी येथील प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले, की डॉ. दाभोलकर यांच्या खुनाचा तपास केंद्रीय गुप्तचर विभागाने करून त्याविषयीचा खटला पुणे विशेष न्यायालयात दाखल केला होता. त्यात दोघांना दोषी ठरवून शिक्षा देण्यात आली आहे. असे असले तरीही या खुनामागचे सूत्रधार अजूनही मोकाट फिरत आहेत.
कॉ. गोविंद पानसरे, प्रा. एम. एम. कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांचे खून खटलेही अजून सुरू असल्याने या चारही खुनामागील सूत्रधारांवरही अद्याप कारवाई होऊ शकली नाही. जोपर्यंत हे सूत्रधार पकडले जात नाहीत, तोपर्यंत विवेकवादी कार्यकर्त्यांना असलेला धोका कायम आहे. डॉ. दाभोलकरांच्या खून खटल्यातून तिघांची सुटका झालेली आहे, त्याविषयी गुप्तचर विभागाने उच्च न्यायालयात दाद मागितली नाही. सर्व अडचणींना तोंड देत गेली १२ वर्षे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे काम निर्धाराने सुरू आहे. संघटनेच्या पुढाकाराने महाराष्ट्रात जादूटोणाविरोधी कायदा व सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा असे दोन सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचे कायदे पारित करण्यात आले आहेत.
त्यामधील जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत १५०० पेक्षा जास्त भोंदू बाबा- बुवांवर कारवाई करण्यात आलेली आहे. अशाच स्वरूपाचा जादूटोणा विरोधी कायदा कर्नाटक व गुजरात या राज्यांमध्येदेखील करण्यात आलेला आहे. जादूटोणाविरोधी कायदा देशभरात लागू करावा, असेही निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर समितीचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बर्गे, सागर भुंजे, ॲड. महेंद्र डेरे, विश्वास चव्हाण, नितीन वि. बर्गे, हेमंत जाधव, अजित वि. बर्गे, सचिन बा. बर्गे, संजय दीक्षित, अनिल पवार, सुधाकर बर्गे यांच्या सह्या आहेत.