सातारा : साताऱ्यात गणेशोत्सव (दि. २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर ) आणि ईद-ए-मिलाद हे दोन महत्वाचे सण एकाच काळात येत असल्याने पोलिस प्रशासनाने सुरक्षेची प्रभावी तयारी केली आहे. सणांदरम्यान शांतता, सुव्यवस्था व नागरिकांचा सुरक्षिततेचा विचार करून शाहुपुरी पोलिस ठाणे हद्दीतील ६२ उपद्रवी इसमांवर भारतीय नागरिक सुरक्षा अधिनियमचे कलमान्वये आदेश लागू करण्यात आले आहेत. पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या आदेशावरून ही कारवाई करण्यात आली.
उपद्रवी इसमांविरुद्ध यापूर्वी खंडणीखोरी, चोरी, जबरी चोरी, बेकायदेशीर जमाव, हत्यारे बाळगणे, मारामारी, धमकी, शिविगाळ, जखमी करणे अशा गुन्ह्यांची नोंद आहे. वारंवार गुन्हे करूनही शिक्षा व कारवाईचा परिणाम न होणाऱ्या सराईत गुन्हेगारांना गणेश विसर्जन मिरवणूकीदरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी सातारा शहर व शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील २०४ जणांना दोन दिवसासाठी सातारा तालुक्याच्या हद्दीतून तडीपार करण्यात आले आहे.
विविध प्रकरच गंभीर गुन्हे दाखल असलेल्या या २०४ जणांना तडीपार करण्याबाबत शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र मस्के व शाहूपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक सचिन म्हेत्रे यांनी अतिरिक्त पोलिस अधिक्षकांकडे प्रस्ताव पाठविले होते. त्यानुसार त्यांना पाच सप्टेंबरला रात्री बारापासून सात सप्टेंबर रात्री १२ पर्यंत तालुका हद्दीत न येण्याचे आदेश देण्यात आले आहेत.