अवैध गोशाळा व गोरक्षकांवर कारवाई करावी

महाराष्ट्र कुरेशी समाज संघर्ष समितीचे जिल्हा प्रशासनाला निवेदन

by Team Satara Today | published on : 31 July 2025


सातारा : राज्यात गोरक्षक कार्यकर्ते व अवैध गोरक्ष संघटना हिंसाचार व धमक्या देऊन खोट्या केसेस घालण्यात येतात व गोरक्षण कायद्याच्या माध्यमातून कुरेशी समाजाला त्रास दिला जातो. याबाबत अन्याय व छळ तत्काळ थांबवून कायद्याचा गैरवापर टाळला जावा, अशी मागणी महाराष्ट्र कुरेशी समाज संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली.

जिल्हा प्रशासनाचे निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांना संघर्ष समितीचे सातारा जिल्हाध्यक्ष सादिक भाई बेपारी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने निवेदन सादर केले. हे निवेदन सादर करताना संघर्ष समितीचे दोनशे सदस्य उपस्थित होते.

या निवेदनात नमूद आहे की, तथाकथित गोरक्ष कार्यकर्ते स्थानिक पोलीस, पशुसंवर्धन अधिकारी, प्रशासन कुरेशी समाजाचा वेगवेगळ्या कारणास्तव अनावश्यक छळ करतात. त्यामुळे संपूर्ण समाज आर्थिक सामाजिक व मानसिक दडपणाखाली आहे. महाराष्ट्रात 60 लाखापेक्षा अधिक कुरेशी समाज व्यवसाय करत आहे. या बंदमुळे सर्वात जास्त फटका शेतकर्‍यांना बसत आहे. शेतकर्‍यांनी त्यांची भाकड जनावरांचे करायचे काय, हा प्रश्न उपस्थित होत आहे. शासनाने प्रत्येक जनावरांसाठी पशुवैद्यकीय प्रमाणपत्र लागू करावे, जिल्ह्यात कत्तलखाने बाजार दुकान कोंडवाडा निर्माण करावा व अवैध गोरक्षण संस्था व गोरक्षकांवर कठोर कारवाई करावी. या मागण्या मान्य तात्काळ करण्यात याव्यात. तोपर्यंत कुरेशी समाजाचा हा संप सुरूच राहणार आहे. या व्यवसायावर अवलंबून असणार्‍यांची गैरसोय होणार आहे. तरीही बंद काळात आम्हाला सहकार्य करावे, असे आवाहन कुरेशी समाजाकडून करण्यात आले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
आषाढी वारीतील सेवेकरांसाठी रंगला कृतज्ञता सोहळा
पुढील बातमी
डॉक्टर स्वाती गरगटे यांचे निधन

संबंधित बातम्या