दहिवडी : माण तालुक्यातील वरकुटे-मलवडी नजीक असलेल्या कुरणेवाडी येथील मिसाळवस्तीवर सोमवारी मध्यरात्री एका शेतकरी कुटुंबावर सशस्त्र दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात दरोडेखोरांनी शेतकरी दाम्पत्याला बेदम मारहाण करून सुमारे ३ लाख रुपये किमतीचा ऐवज लंपास केला असून, या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
याबाबत मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, मिसाळवस्ती येथील शेतकरी प्रल्हाद मिसाळ आणि त्यांच्या पत्नी सुला हे सोमवारी रात्री आपल्या शेतातील घरात झोपले होते. मध्यरात्री साडेबारा ते दीड वाजेच्या सुमारास तोंडाला रुमाल बांधलेल्या आणि रेनकोट घातलेल्या सुमारे ८ सशस्त्र दरोडेखोरांनी घरात प्रवेश केला. या दरोडेखोरांचे वय २० ते २५ वयोगटातील होते. घरात घुसताच त्यांनी शस्त्रांचा धाक दाखवत मिसाळ दाम्पत्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी आरडाओरडा केल्यामुळे संतप्त झालेल्या दरोडेखोरांनी सुला यांना चाकूचा धाक दाखवला, तर प्रल्हाद यांच्यावर चाकूने वार करून इलेक्ट्रॉनिक पिस्तूलद्वारे (टेझर गन) शॉक देण्याचा प्रयत्न केला. जीवे मारण्याची धमकी देऊन दरोडेखोरांनी संपूर्ण घरात दहशत निर्माण केली होती.
यानंतर दरोडेखोरांनी घरातील देवघर फोडून कपाटातील सुमारे ३ तोळे सोने, मंगळसूत्र, बाळ्या, चांदीचे कडे, अंगठी आणि रोख रक्कम असा एकूण ३ लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. घटनेची माहिती मिळताच म्हसवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमण, कॉन्स्टेबल अनिल वाघमोडे व जगन्नाथ लुबाळ यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, यातील आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.