सातारा दि. 13 : ‘मराठा क्रांती मोर्चा’ किंवा ‘सकल मराठा क्रांती मूक मोर्चा’ अशा नावांनी आणि अपवाद म्हणून ‘मराठा-कुणबी क्रांती मोर्चा’ अशा नावाने मोर्चे निघेपर्यंत स्वतःला ‘मराठा’ समजणार्या जातीतील माणसे स्वतःची ‘जात ओळख’ घेऊन सार्वत्रिक प्रमाणावर उभी राहिल्याचे उदाहरण स्वातंत्र्यानंतर तरी अनुभवायला आले नव्हते. मात्र मराठा हेच कुणबी असल्याचा पुरावा संत तुकोबारायांच्या अभंगामध्येच समाविष्ठ आहे. ‘बरा कुणबी केलो, नाही तरि दंभेचि असतो मेलो’, असे त्यांनी अभंगात म्हटल्याची माहिती धरणग्रस्तांचे नेते, श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष व मराठा आरक्षण लढ्यातील अभ्यासक डॉ. भारत पाटणकर यांनी दिली.
डॉ. पाटणकर यांनी मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने मराठा म्हणजेच कुणबी असल्याची अभ्यासपूर्ण मांडणी केली आहे. त्याअनुषंगाने त्यांनी म्हटले आहे की, ‘मराठा’ या जात नावाने संघटित झालेल्या संघटना अस्तित्वात होत्या पण संख्येच्या सहभागाच्या दृष्टीने पाहिले तर अशा संघटनांकडे बहुसंख्य मराठ्यांनी पाठच फिरवल्याचे लक्षात येते. त्यामुळे या मोर्चाच्या बाबतीत असे काय घडले की ज्यामुळे प्रचंड संख्येने मराठा म्हणवणारे स्त्री-पुरुष सहभागी झाले, याचा सखोल पद्धतीने शोध घेणे अत्यावश्यक आहे. केवळ कोपर्डीच्या घटनेने असे घडले ही भूमिका दृश्य वास्तवाच्या मागे असलेल्या आणि गेल्या काही वर्षांच्या काळात घडत आलेल्या प्रक्रियांकडे दुर्लक्ष करणारी आहे, असेच म्हणावे लागेल.
सर्वांत प्रथम, स्वतःला ‘मराठा’ म्हणवणार्या जनतेने अशा प्रकारे ‘मराठा जातीचे’ म्हणून घेणे कधी सुरू झाले, याचा शोध घ्यावा लागेल. या संदर्भातला मला गवसलेला सर्वांत जुना पुरावा हा जगद्गुरू संत तुकोबारायांच्या अभंगातला आहे.
‘बरा कुणबी केलो । नाही तरि दंभेचि असतो मेलो ॥1॥ भले केले देवराया । नाचे तुका लागे पाया ॥ विद्या असती काही । तरी पडतो अपायी ॥2॥ सेवा चुकतो संतांची । नागवण हे कुळाची ॥3॥ गर्व होता ताठा । जातो यमपंथे वाटा ॥4॥तुका म्हणे थोरपणे । नरक होती अभिमाने ॥5॥
या अभंगामध्ये तुकोबारायांनी अत्यंत अभिमानाने स्वतःचे ‘कुणबीपण’ मिरवले आहे. कुणबी असल्यामुळे गर्व, ताठा अशा दुर्गुणांपासून आपण मुक्त आहोत, असे ते म्हणतात. एवढेच नाही तर विद्या घेण्याचा अधिकारच नसल्यामुळे ‘त्यांच्याकडे असलेल्या’ विद्येअभावी मी अपायकारक गोष्टींपासून वाचलो असे म्हणतात. तुकोबारायांचे वंशज, देहचे मोरे, आज स्वतःला मराठा आणि उच्चस्तरीय मराठा मानतात. त्यांचे नातेसंबंध जुळवताना याचा विचार करतात. हा एक प्रचंड मोठा बदल आहे. खरे म्हणजे शेतीत राबून जगणारी जात म्हणून जे जीवन आहे त्यात काही फरक झालेला नाही. पण स्वतःची सांस्कृतिक-सामाजिक ओळख मात्र बदलली गेली आहे. कुणबी हा शब्द ‘कुणबावा करणारा’ याच अर्थाचा आहे. याचा अर्थच शेतीत कष्ट करून, उत्पन्न काढून जगणारा असाच होतो, असेही डॉ. भारत पाटणकर यांनी म्हटले आहे.
महात्मा फुले यांच्या लिखाणातही पुरावा....
दुसरा पुरावा महात्मा जोतीराव फुले यांच्या लिखाणात आढळत असल्याचा दावा डॉ. भारत पाटणकर यांनी केला. पाटणकर म्हणाले, महात्मा फुले यांनी शेतीत कष्ट करून जगणार्या तीन जातींची वैशिष्ट्ये सांगितली आहेत. कोरडवाहू शेती करणारे कुणबी (कुळंबी), माळव्याचे (पाले फळ भाज्यांचे) इत्यादी उत्पादन करणारे ते माळी आणि कोरडवाहू शेती आणि मेंढपाळी करणारे ते धनगर अशा या तीन शेतकरी जाती आहेत. या जाती शेतीत राबून उत्पादन करणार्या. पण बहुसंख्य कुटुंबे थोडी-थोडी जमीन असणारे अल्पभूधारक किंवा मध्यम शेतकरी. यापैकीच शेतकरी जमिनदाराच्या शेतावर कूळ म्हणून राबणारे. अर्थातच 98-99 टक्के कुटुंबे जगण्यापुरते उत्पन्न काबाडकष्ट करून घेणारी. अशाच शेतकर्यांच्या ज्या जातीची संख्या ज्या गावांमध्ये जास्त असेल त्यापैकीच त्यातल्या त्यात स्वतंत्रपणे शेती करणार्या आणि जगण्यासाठी लागणार्या शेतीपेक्षा काही प्रमाणात जास्त शेती असणार्या शेतकर्यांमधूनच मुलकी किंवा पोलीस पाटील व्हायचे. शिवरायांचे पूर्वज वेरूळ या लेण्यांच्या गावात असेच पाटील होते. त्यामुळेच महात्मा फुलेंनी शिवरायांचा पोवाडा लिहिताना त्यांना ‘कुळवाडी कुळभूषण’ अशा उपाधीने गौरवले आहे.