उरमोडी धरणाचे चारही वक्र दरवाजे उघडले

2000 क्युसेक पाण्याचा विसर्ग

by Team Satara Today | published on : 01 July 2025


सातारा : पाऊस काहीकेल्या थांबायचे नाव काढत नाही. गेले दोन दिवस उघडझाप करणार्‍या पावसाने सोमवारी सकाळपासून पुन्हा जोर वाढवला. रविवारी रात्रभरही अधूनमधून पावसाच्या सरी कोसळतच राहिल्या. 

पश्चिमेकडे धरण पाणलोट क्षेत्रात धुवाँधार पर्जन्यवृष्टी सुरू असल्यामुळे धरणांमधील पाणीसाठा वाढू लागला आहे. सोमवारी सकाळी उरमोडी धरणाचे चारही दरवाजे उघडून 2000 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. यंदा पावसाने नको नकोसे केले आहे. मशागतीची कामेही त्याने करू दिली नाहीत. त्यामुळे बहुतांश पेरण्या रखडल्या आहेत. शेतकरी चिंतेत आहे. मात्र, पाऊस काही थांबायला तयार नाही. 15 मेपासून यंदा पावसाने सुरुवात केली आहे. सूर्यदर्शनही अपवादानेच होत आहे. उघडझाप करणारा पाऊस शेतात वापसा येवू देत नाही. गेले दोन दिवस अधूनमधून पावसाने उघडीप दिली तरी पुन्हा येणार्‍या पावसाच्या सरी जनजीवन चिंब करत आहेत.

रविवारी रात्रीपासून तर पश्चिमेकडील महाबळेश्वर, वाई, जावली, सातारा, कराड, पाटण या तालुक्यांमध्ये पावसाचा जोर पुन्हा वाढला. सोमवारीही ही संततधार कायम राहिली. त्यामुळे उरमोडी धरणातून 500 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. उरमोडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे प्रकल्पात पाण्याची वाढ होत आहे. त्यामुळे सोमवारी सकाळी उरमोडी धरणाचे चारही वक्र दरवाजे उघडण्यात आले वक्र दरवाजातून 1500 क्युसेक तर जलविद्युत प्रकल्पातून 500 क्युसेक विसर्ग करण्यात आला.

उरमोडी धरण क्षेत्राच्या खालील बाजूस असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदीपात्रात कोणीही जाऊ नये, अशा सूचना कार्यकारी अभियंता कृष्णा सिंचन विभागाच्या वतीने देण्यात आल्या आहेत. उरमोडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे पाण्याची आवक वाढत आहे. हे पाणी नियंत्रित करण्यासाठी पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पावसाचे प्रमाण वाढल्यास हा विसर्ग वाढवण्यात येणार आहे, अशी माहिती उरमोडी धरण कार्यकारी अभियंता गणेश कणसे यांनी दिली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा जिल्ह्यातील ४५ हजार लाभार्थ्यांना घरकुलांनासाठी मिळणार निधी
पुढील बातमी
वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या युवतीचा इमारतीवरून पडून मृत्यू

संबंधित बातम्या