सातारा : सातारा नगरपालिकेसह जिल्ह्यात नऊ नगरपालिकांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू झाली असून त्याचाच एक भाग म्हणून सातारा येथील बॉम्बे रेस्टॉरंट उड्डाणपूलानजीक जिल्हा पोलीस दलाच्या कर्मचाऱ्यांसह निवडणूक विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सातारा शहरात येणाऱ्या खाजगी वाहनांची कसुन तपासणी केली जात आहे. गेल्या दोन दिवसांपासून ही प्रक्रिया सुरू झाली आहे. या निमित्ताने सातारा पोलीस ॲक्शन मोडवर आल्याचे दिसून आले.
सातारासह जिल्ह्यात कराड, मलकापूर, रहिमतपूर, म्हसवड, फलटण, वाई, पाचगणी, महाबळेश्वर नगरपालिका तर मेढा नगरपंचायतीसाठी निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. या निवडणुकांसाठी २ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकांमध्ये कोणताही गैरप्रकार होऊ नये, कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहचू नये यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत.
सातारा शहर हे जिल्ह्याचे ठिकाण असून सातारा शहरात सर्वच पक्षाची प्रमुख कार्यालये आहेत. या कार्यालयातूनच निवडणुकीची सर्व सूत्रे हलवली जातात. बहुतांश वेळा निवडणुकांमध्ये पैसे, दारूचे वाटप मोठ्या प्रमाणावर केले जाते अशा गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सातारा जिल्हा पोलीस दल आणि निवडणूक विभागाचे कर्मचारी दक्ष झाले असून सातारा येथील बॉम्बे रेस्टॉरंट चौकातील उड्डाणपुलाखाली खासगी वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. वाहन कुठून आले? कोठे निघाले? याची माहिती घेत वाहनातील साहित्य, कागदपत्रे याची सविस्तर माहिती घेतली जात आहे. ही तपासणी ऑन कॅमेरा केली जात आहे. गेल्या दोन दिवसांपासून ही मोहीम सुरू करण्यात आली असून मतदानाच्या दिवसापर्यंत वाहन तपासणी सुरूच राहणार असल्याचे समजते.