सातारा : गडकर आळीतील ग्रामदैवत श्री पेढ्याचा भैरवनाथ मंदिर परिसराच्या विकासकामावरून आता राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले आहे. नैसर्गिक पाऊलवाटा, माती आणि हिरवाईचा परिसर कॉंक्रीटच्या विळख्यात का आणला, असा थेट सवाल उपस्थित करीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने नगराध्यक्ष अमोल मोहिते यांना निवेदन दिले. मंदिर परिसराची तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून कॉंक्रीटीकरणाच्या कामाची तांत्रिक व निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली.
शहरप्रमुख प्रणव सावंत यांच्या पुढाकाराने गडकर आळीतील ग्रामस्थ आणि शिवसैनिकांनी नगराध्यक्षांची भेट घेतली. कॉंक्रीटीकरणापूर्वी आणि नंतरची छायाचित्रे दाखवून मंदिर परिसराचे मूळ नैसर्गिक स्वरूप बदलल्याचा दावा करण्यात आला. नैसर्गिक पाऊलवाटा असताना कॉंक्रीटचा घाट घालण्याची गरज नेमकी काय होती? या कामाचा आराखडा कोणी तयार केला, कोणत्या तांत्रिक निकषांवर मंजुरी देण्यात आली आणि कोणत्या तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेण्यात आले, याचा खुलासा करण्याची मागणी करण्यात आली.
सार्वजनिक निधीतून होणारे काम केवळ दिसायला आकर्षक नव्हे, तर दर्जेदार आणि दीर्घकालीन असणे आवश्यक आहे. त्यामुळे अंदाजपत्रक, तांत्रिक मंजुरी, वापरलेले साहित्य, कामाची गुणवत्ता आणि संबंधित ठेकेदाराची जबाबदारी यांची तपासणी करावी, अशी मागणी करण्यात आली. अनियमितता किंवा निकृष्ट काम आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करून ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली.
मंदिर परिसरातील वृक्षारोपणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. किती झाडे लावली, किती जगली आणि संगोपनासाठी किती खर्च झाला, याचा हिशेब सार्वजनिक करण्याची मागणी करण्यात आली.
दरम्यान, मंदिराचे पावित्र्य, भाविकांची सुरक्षितता आणि परिसरातील शिस्त अबाधित राखण्यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही करण्यात आली. विकासाच्या नावाखाली श्रद्धास्थानाचे नैसर्गिक अस्तित्वच संपवू नये, अशी संतप्त भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
भैरवनाथ देवस्थानात ‘विकासा’च्या नावाखाली सिमेंटचा मारा? कॉंक्रीटीकरणावर ठाकरे गटाचा सवाल; कामाची तांत्रिक चौकशी, ठेकेदारावर कारवाईची नगराध्यक्षांकडे मागणी
by Team Satara Today | published on : 05 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा