जिल्ह्यात पुन्हा एकदा ''शंभूराज"

सलग तिसऱ्यांदा पालकमंत्रीपदी निवड; जयकुमार गोरे सोलापूर, मकरंद पाटील बुलढाणा, तर शिवेंद्रराजे लातूरचे पालकमंत्री
सातारा : मोठ्या प्रतीक्षेनंतर राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांची राज्यातील विविध जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदी निवड झाली असून, पर्यटन व खणीकर्म मंत्री शंभूराज देसाई यांची सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी चंद्र निवड झाली आहे. जिल्ह्यातील जयकुमार गोरे यांची सोलापूर, मकरंद पाटील यांची बुलढाणा तर लातूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी शिवेंद्रराजे भोसले यांची निवड झाली आहे.

गेल्या एक महिन्यापासून चर्चेत असलेल्या पालकमंत्रीपदाची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साधलेले राजकीय संतुलन आणि काही धक्कातंत्रे यानिमित्ताने समोर आली आहेत. सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांची वर्णी लागली आहे, तर भाजपचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांच्याकडे लातूर, राष्ट्रवादी अजितदादा गटाचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्याकडे बुलढाणा, तर ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे सोलापूर जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

शंभूराज देसाई यांच्या पालकमंत्री पदाच्या नेमणुकीची राजकीय वर्तुळात चर्चा होती. शिंदे गटाने सातारा जिल्ह्यावर आपलीच पकड राहील, ही व्यवस्था केल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यांसाठी पालकमंत्रीपद देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नगर विकास मंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजितदादा पवार यांच्यात चर्चा झाली. त्या चर्चेनुसार जिल्ह्याचा पालकमंत्री हा स्थानिक आमदार असणार नाही, तसेच त्याचा अनुभव आणि प्रगती पुस्तक तपासण्याच्या निकषावर ही नावे जाहीर करण्यात आली आहेत. सातार्‍याचे पालकमंत्रीपद आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना मिळेल, अशी राजकीय चर्चा होती. त्या दृष्टीने खासदार उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजकीय मोर्चेबांधणी सुद्धा केली होती. मात्र प्रत्यक्षामध्ये या यादीमध्ये अनेक उलट फेर पहायला मिळाले.

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना लातूर जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे. ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरे यांना अपेक्षेप्रमाणे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पद दिले गेले आहे. माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपचे वर्चस्व कायम ठेवणे आणि राष्ट्रवादीला टक्कर देणे हाच या मागचा हेतू आहे. वाईचे आमदार आणि राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्याकडे बुलढाणा जिल्ह्याची जबाबदारी दिली गेली आहे. मराठवाड्यातील सिंचन अनुशेष तसेच तेथील राजकीय परिस्थिती संतुलन या दृष्टीने अजित दादा गट व भाजप यांनी नव्या चेहर्‍यांना पसंती दिली आहे. त्यादृष्टीने शिवेंद्रसिंहराजे व मकरंद पाटील यांची निवड औचित्य पूर्ण मानली जात आहे. शंभूराज देसाई तसेच महायुतीचे सर्व जिल्ह्यातील मंत्री यांच्यामध्ये पालकमंत्री पदासाठी कोणतीही स्पर्धा नव्हती. महायुतीचे तिन्ही नेते जे ठरवतील त्या दृष्टीने निर्णय होईल, असे सांगितले जात होते.

सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री पद शंभूराज देसाई यांना मिळाल्याचे जाहीर झाले, त्यावेळी पाटणमध्ये देसाई समर्थकांनी आनंद व्यक्त केला. शंभूराज देसाई यांनी यापूर्वी अडीच वर्ष सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री पद भूषवले होते. येथील प्रशासनावर त्यांनी चांगली पकड ठेवली होती. तसेच महायुतीच्या सर्व आमदारांबरोबर त्यांनी समन्वयाने काम केल्याने त्यांना सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. ठाणे जिल्ह्याची जबाबदारी स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याकडे ठेवली आहे. सातारा जिल्ह्यामध्ये आपले वर्चस्व राहील, अशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजकीय तजवीज केल्याची चर्चा आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री जाहीर झाल्यामुळे येत्या 26 जानेवारीला पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते ध्वजारोहण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.



मागील बातमी
इस्त्रायल-हमास युद्ध थांबणार
पुढील बातमी
डिजिटल नकाशे म्हणजे मालमत्तेचे वैध पुरावे

संबंधित बातम्या