सातारा : निसर्गसंपन्नतेसह शांततेचा आनंद देणाऱ्या गोडोली येथील श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज ऊर्फ दादा महाराज आयुर्वेदिक गार्डन आता ज्ञान संपन्नताही देणार आहे. तब्बल चार गुंठे जागेत अद्ययावत अभ्यासिका येथे उभारण्यात आली आहे. या अभ्यासिकेत एकावेळी १५० विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणे शक्य होणार आहे.
या अभ्यासिकेसाठी सातारा पालिकेस पुढाकार घेण्याच्या सूचना खासदार उदयनराजे भोसले केल्या होत्या. शहरासह परिसरातील युवकांनी संवादादरम्यान उदयनराजे यांच्याकडे सुसज्ज अभ्यासिकेची मागणी केली होती. या वेळी त्यांनी युवकांना तशी अभ्यासिका उभारण्याचे वचन दिले होते. या वचनानुसार ही अभ्यासिका उभारण्यासाठी उदयनराजे यांनी ॲड. डी. जी. बनकर यांना सांगितले होते. त्यांनी पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करत ही सुसज्ज, अद्ययावत अभ्यासिका उभारण्याचे काम पूर्ण केले. या अभ्यासिकेची, तसेच इतर सर्व बाबींची पाहणी नुकतीच उदयनराजेंनी केली. येत्या काही दिवसांत या अभ्यासिकेचे लोकार्पण करण्यात येणार असल्याची माहिती ॲड. डी. जी. बनकर यांनी दिली.
अशी आहे अभ्यासिका
चार गुंठे जागेत अभ्यासिका उभारण्यात आली असून, जवळपास १५० विद्यार्थ्यांना एकावेळी येथे अभ्यास करता येणार आहे. येथे प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र आसनव्यवस्था आहे. त्याचबरोबर आठवड्यातून एकदा विद्यार्थ्यांसाठी सनदी अधिकाऱ्यांच्या व्याख्यानांचेही आयोजन करण्यात येणार आहे. येथे स्पर्धा परीक्षेची पुस्तकेही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच मुलींसाठीही स्वतंत्र बैठक व्यवस्था केली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनीही या उद्यानाला भेट देऊन येथील अभ्यासिकेची पाहणी केली. त्यांनी या वेळी मुख्याधिकारी अभिजित बापट यांना आवश्यक त्या सूचना देखील केल्या आहेत. या वेळी अभियंता दिलीप चिद्रे, ॲड. डी. जी. बनकर उपस्थित होते
प्रसन्न वातावरण अभ्यासासाठी पोषक आहे. एमपीएससी, यूपीएससी आणि तत्सम स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्यांसाठी हायटेक ग्रंथालय, ई ग्रंथालय उपलब्ध करणार आहेत. येथे विधायक आणि स्पर्धा परीक्षांना पूरक ठरणारे उपक्रम याठिकाणी राबविले जातील.
- ॲड. दत्ता बनकर