सातारा : वाई शहरातील मेडिकलमध्ये रात्रीच्या वेळी चोरी करून पसार झालेल्या संशयिताला वाई पोलिसांनी अवघ्या 24 तासांत जेरबंद केले. कैलास विष्णू कदम (वय 34, रा. मालतपूर, पसरणी, ता. वाई, जि. सातारा) असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून चोरीच्या गुन्ह्यात वापरलेली हातोडी व पक्कड जप्त करण्यात आली असून, या प्रकरणातील अन्य साथीदारांचा शोध सुरू आहे.
वाई शहरातील एका मेडिकलमध्ये चोरी झाल्याची तक्रार 14 ऑगस्ट रोजी वाई पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. गुन्हा नोंद होताच पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत संशयिताचा शोध सुरू केला. उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांनी गुन्हेप्रकटीकरण पथकाला तत्काळ कारवाईच्या सूचना दिल्या. पोलीस उपनिरीक्षक अमित सुर्वे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने परिसरातील साक्षीदार तसेच बातमीदारांकडून माहिती संकलित करून तपास पुढे नेला.
दरम्यान, मेडिकल चोरीतील संशयित सिद्धनाथवाडी परिसरातील गुरेबाजार झोपडपट्टी भागात असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी परिसरात पाळत ठेवून सापळा रचला. पोलिसांची चाहूल लागताच एका इसमाने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले.
पोलीस ठाण्यात आणून चौकशी केल्यानंतर त्याने मेडिकल चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याची अंगझडती घेतली असता चोरीसाठी वापरलेली हातोडी आणि पक्कड आढळून आली. पोलिसांनी दोन्ही साहित्य जप्त केले आहे.
या चोरीमध्ये आणखी व्यक्तींचा सहभाग आहे का, तसेच चोरीचा मुद्देमाल कुठे आहे, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. संशयिताच्या साथीदारांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची स्वतंत्र पथके कार्यरत करण्यात आली आहेत.
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी, तपास पथक प्रमुख अमित सुर्वे, पोलीस हवालदार लेंभे, पोलीस कॉन्स्टेबल विक्रम धोत्रे, नितीन कदम, हेमंत शिंदे आणि विशाल शिंदे यांनी ही कारवाई केली. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार लेंभे करीत आहेत.