भिसे टोळीचे दोघेजण सातारा जिल्ह्यातून तडीपार

पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांचे आदेश

by Team Satara Today | published on : 04 July 2025


सातारा : सातारा शहरामध्ये सातत्याने वेगवेगळे गुन्हे करणार्‍या दोन सराईत गुन्हेगारांना सातारा जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. अविनाश राजाराम भिसे वय 25 आणि रोहित जितेंद्र भोसले वय 22 दोघेही राहणार प्रतापसिंहनगर, सातारा अशी दोघांची नावे आहेत.

हद्दपार प्राधिकरणाचे प्रमुख पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांनी हे आदेश दिले आहेत. भिसे हा टोळी प्रमुख असून त्याने आणि त्याचा सहकारी रोहित भोसले यांनी सातत्याने सातारा शहरांमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला होता. घरफोडी, चोरी करणे, जबरी चोरी करणे असे विविध गुन्हे त्यांच्यावर दाखल होते. महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 प्रमाणे सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी या टोळी विरुद्ध सातारा जिल्ह्यातून तडीपार करण्याचा प्रस्ताव हद्दपार प्राधिकरणाला सादर केला होता. या प्रस्तावाची चौकशी उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा राजीव नवले यांनी केली. या टोळीतील इसमांना वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई तसेच सुधारण्याची संधी देऊनही त्यांच्यात कोणताही फरक पडला नाही. त्यामुळे या टोळीला सातारा जिल्ह्याच्या हद्दीतून दोन वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिले. 

अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांनी सरकारी पक्षाच्या वतीने काम पाहिले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, पोलीस हवालदार प्रमोद सावंत, अमित सपकाळ, राजू कांबळे, शिवाजी भिसे, अनुराधा सणस, सातारा शहर पोलीस ठाण्याचे हवलदार दीपक इंगवले, संदीप पवार, अमोल सापते यांनी योग्य तो पुरावा सादर केला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कंत्राटदार महासंघाचे जिल्हा प्रशासनाला निवेदन
पुढील बातमी
युवतीच्या विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा

संबंधित बातम्या