मानवी आरोग्यास घातक ठरणारे सणांमधील ध्वनिप्रदूषण पूर्णपणे थांबवले पाहिजे - विद्यानंद बापटांची रोखठोक भूमिका

by Team Satara Today | published on : 31 August 2026


पुणे : सार्वजनिक उत्सवांमधील कर्णकर्कश डीजे, ढोल-ताशांचा दणदणाट आणि रस्त्यांवरील अतिक्रमणाविरोधात आवाज उठवणारे विद्यानंद बापट आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. परंपरेच्या नावाखाली नागरिकांच्या मूलभूत अधिकारांवर गदा आणणाऱ्या कोणत्याही बाबीचे समर्थन होऊ शकत नाही. समाजाने जशा सती प्रथा आणि बालविवाहासारख्या शेकडो वर्षांच्या अनिष्ट प्रथा बंद केल्या, तसेच मानवी आरोग्यास घातक ठरणारे सणांमधील ध्वनिप्रदूषणही आता पूर्णपणे थांबवले पाहिजे," अशी रोखठोक भूमिका विद्यानंद बापट यांनी मांडली आहे. हा लढा आता केवळ गणेशोत्सवापुरता मर्यादित नसून कायमस्वरूपी सुरू राहील," असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

पुणे महानगरपालिकेच्या बैठकीत डीजेविरोधात परखड भूमिका मांडल्याने चर्चेत आलेले बापट मूळचे पुण्याच्या नारायण पेठेतील रहिवासी असून एका बीपीओ कंपनीत कार्यरत आहेत. महापालिकेतील घटनेनंतर सात दिवसांत राज्यभरातून अनेक सामान्य नागरिकांचा, आयटी कर्मचाऱ्यांचा आणि सुजाण पुणेकरांचा त्यांना उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे.

बदलत्या पुण्यात जुनाट पद्धतींचा दुराग्रह नको

आपली भूमिका स्पष्ट करताना बापट म्हणाले, "१३५ वर्षांपूर्वी उत्सव सुरू झाला तेव्हाचे पुणे आणि आजचे माहिती तंत्रज्ञानाचे केंद्र (IT Hub) असलेले पुणे यात जमीन-आस्मानाचा फरक आहे. आज लोक 'वर्क फ्रॉम होम' आणि विविध आंतरराष्ट्रीय शिफ्ट्समध्ये काम करतात. पूर्वी वाहनांची संख्या नगण्य होती आणि लाऊडस्पीकर नव्हते. आता अरुंद रस्त्यांवर मोठे मंडप, डीजे आणि ढोल-ताशांच्या भिंतींमुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. मानवी अधिकारांवर गदा आणणाऱ्या ध्वनिप्रदूषणालाही पूर्णपणे आळा बसलाच पाहिजे."

पुण्याला हे का जमत नाही?

सोलापूरसारख्या निमशहरी भागाने जर गेल्या वर्षी ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण मिळवून दाखवले असेल, तर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणवणाऱ्या पुण्याला हे का जमत नाही?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच, जोपर्यंत कायदे अचूक आणि पळवाटरहित होत नाहीत, तोपर्यंत नागरिकांच्या आरोग्याशी होणारा हा खेळ थांबणार नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

कायद्यातील पळवाटा बुजवण्याची मागणी


ध्वनिप्रदूषणाचे नियम कागदावर असले तरी स्थानिक प्रशासनाला लाऊडस्पीकरच्या परवानग्या देण्याचे जे स्वेच्छाधिकार आहेत, त्या पळवाटांचा गैरवापर होतो. जोपर्यंत कायद्यातील या पळवाटा पूर्णपणे बंद केल्या जात नाहीत आणि प्रशासकीय इच्छाशक्ती दाखवली जात नाही, तोपर्यंत हा त्रास संपणार नाही. सोलापूरसारख्या शहराने जर डीजेवर नियंत्रण मिळवून दाखवले असेल, तर पुण्यातही हे शक्य आहे. लोकशाहीत नागरिकांनी स्वतः सक्रिय होऊन या जनहितार्थ लढ्यासाठी पुढे येण्याचे आवाहनही बापट यांनी केले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली इराणच्या राष्ट्रपतींची भेट; आखातामधील संघर्षादरम्यान पहिल्यांदाच समोरासमोर चर्चा
पुढील बातमी
सातारा झेडपीत नेत्यांचे पुनर्वसन; स्वीकृतची संधी, सहा सदस्य वाढणार, सदस्यांची एकूण संख्या ७१ होणार

संबंधित बातम्या