बारामती : इच्छा असूनही पैशाअभावी घराच्या छतावर सौर प्रकल्प बसविण्यात असमर्थ ठरणाऱ्या वीजग्राहकांसाठी केंद्रसरकारने ‘जनसमर्थ’चे बळ देऊ केले आहे. प्रधानमंत्री सूर्यघर योजनेसाठी एका क्लिकवर ‘जनसमर्थ पोर्टल’द्वारे ९० टक्के कर्ज मिळवता येते आणि ७८ हजारांचे अनुदान सुद्धा. विशेष म्हणजे सौर प्रकल्पासाठी गृहकर्जापेक्षा स्वस्त अगदी ७ टक्के पेक्षा कमी दराने तातडीने कर्ज मिळते. या माध्यमातून मोहोळ तालुक्यातील एका ग्राहकाने कोणतीही पदरमोड न करता हा प्रकल्प साकारला आहे.
ज्या ग्राहकांचा वीजवापर ३०० युनिटच्या घरात आहे, त्यांच्यासाठी ३ किलोवॅट क्षमतेचा सूर्यघर प्रकल्प पुरेसा आहे. यातून साधारणपणे ३०० ते ३६० युनिट वीज महिन्याला तयार होते. या क्षमतेचा प्रकल्पासाठी २ लाखाच्या आत खर्च येतो. घराची रचना, उंची यामुळे ५ ते १० हजारांचा फरक येऊ शकतो. तर ३ किलोवॅट प्रकल्पाला केंद्र सरकारकडून ७८ हजारांची सबसिडी मिळते.
पीएम-सूर्यघर प्रकल्पासाठी कर्ज हवे असल्यास सर्वप्रथम निवडसूचीतील ठेकेदाराकडून सूर्यघर प्रकल्पाचे कोटेशन घ्यावे. तद्नंतर महावितरणच्या https://www.mahadiscom.in/ismart/ या पोर्टलवर १२ अंकी वीजग्राहक क्रमांक टाकून व ठेकेदाराची निवड करुन कोटेशन अपलोड करावे. नोंदणी पूर्ण झाल्याचा SMS दिलेल्या मोबाईल क्रमांकावर प्राप्त होईल. सूर्यघरची नोंदणी पूर्ण झाल्यावर https://www.jansamarth.in/register पोर्टलवर जाऊन नोंदणी करावी. विचारलेली माहिती भरल्यावर विविध राष्ट्रीयकृत बँका व त्यांचे व्याजदर समोर येतील. ग्राहकाने त्याच्या सोयीनुसार बँक व शाखा निवडावी. SMS वर मिळालेला नोंदणीक्रमांक योग्य ठिकाणी टाकून माहिती भरावी. व्हेरिफिकेशन पूर्ण करुन बँक कर्ज मंजूर करते. ठेकेदाराने काम पूर्ण केल्यावर महावितरणकडून पडताळणी होते व दिलेल्या बँक खात्यावर काही दिवसांत ७८ हजारांची सबसिडी जमा होते. ही सर्व प्रक्रिया ऑनलाईन आहे.
मोहोळ तालुक्यातील चिखली येथील श्री. हनुमंत रामलिंग चौधरी या ग्राहकाने कोणतीही पदरमोड न करता हा प्रकल्प बसवला आहे. त्यांच्या ३ किलोवॅट प्रकल्पाला स्टेट बँक ऑफ इंडियाने ७ टक्के दराने २ लाख रुपयांचे कर्ज मंजूर केले होते. प्रकल्प पूर्ण झाल्यावर १३ मार्चला त्यांच्या प्रकल्पाची पडताळणी झाली आणि त्यांना अवघ्या ७ दिवसांत ७८ हजारांचे अनुदान केंद्र सरकारतर्फे प्राप्त झाले. त्यासाठी हनुमंत चौधरी यांना कोणतीही पदरमोड करण्याची गरज लागली नाही.
पैसे नसतानाही मी सूर्यघर प्रकल्प बसवला – हनुमंत चौधरी
कर्ज मिळाले तर बसवू म्हणत मी सूर्यघरसाठी सहज अर्ज केला. नोंदणी पूर्ण झाल्यावर दोन दिवसांनी बँकेचे अधिकारी पडताळणीसाठी आले. माझे एसबीआय बँकेत खाते होतेच. कर्जाची रक्कम २ लाखाच्या आत असल्याने बँकेने कोणतेही तारण न घेता तातडीने कर्ज मंजूर केले. या कामात महावितरण, बँक व ठेकेदारांचे खूप सहकार्य मिळाले. कुठेही कागद लागला नाही. सबसिडी मिळाल्यावर कर्जाचा हप्ता मला पूर्वी येणाऱ्या मासिक वीजबिला इतकाच ठेवल्याने मला कोणताही आर्थिक भार येणार नाही. आता मला भविष्यातील वीज दरवाढीचीही चिंता नाही.
हनुमंत चौधरी,
(पीएम-सूर्यघर लाभार्थी)
मु.पो. चिखली, ता. मोहोळ, जि. सोलापूर
मो. ८८८८९१५६९१