सातारा : कोरेगाव शहरातून जाणाऱ्या सातारा -हैद्राबाद या महामार्गावर अचानक वाहनधारकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. सुमारे तीन तास वाहतूक कोंडी झाल्यामुळे वाहनाच्या लांबच-लांब रांगा लागल्या होत्या. अखेर पोलीस निरीक्षक अरुण देवकर पोलिसांचा फौजफाटा घेऊन रस्त्यावर उतरल्यानंतर हळू -हळू वाहतुकीची ही कोंडी फोडण्यात यश आले, तरीही ही वाहतुकीची कोंडी फोडताना पोलिसांच्याही नाकीनऊ आले. विद्यार्थी, विद्यार्थीनाही वाहतुक कोंडीचा सामना करावा लागला. रात्री ८ वाजण्याच्या दरम्यान वाहतूक सुरळीत झाली. सोमवारी कोरेगावचा आठवडा बाजार असतो त्यामुळे शहरात वाहनांची गर्दी असतेच त्यातच दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास जरंडेश्वर साखर कारखान्याची ऊसवाहतुकीची वाहने सूरू झाल्यामुळे कोरेगावमध्ये वाहतुक कोंडी झाल्याची चर्चा होती.
याबाबत अधिक माहिती अशी की, सोमवारी कोरेगावचा आठवडा बाजार असतो त्यामुळे रोजच्यापेक्षा दुचाकी, चारचाकी वाहनांची संख्या शहरात वाहनांची वाढते. सोमवार असूनही दिवसभर सातारा - हैद्राबाद महामार्गावर वाहतुक सुरळीत होती. परंतु दुपारी ४ वाजल्यापासून अचानक वाहतुक कोंडी सुरू झाली. सुमारे तासाभराच्या कालावधीत तर रस्त्यावर चारचाकी, दुचाकी वाहनांच्या लांबच -लांब रांगा लागल्या. लांब पल्ल्याच्या धावणाऱ्या एस. टी. बस, ट्रक, इतर वाहने जाग्यावर थांबून होते. वाहतुक कोंडी सुटतच नव्हती. अखेर कोरेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर पोलीस कर्मचाऱ्यांचा फौज फाटा घेऊन रस्त्यावर उतरले तरीही वाहतुक कोंडी फुटत नव्हती. वाहतुक सुरळीत करता - करता पोलीसांच्याही नाकीनऊ आले. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास वाहतुक सुरळीत झाली. गेली दोन दिवस ऊसदरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जरंडेश्वर कारखाना परिसरात आंदोलन सूरू असल्यामुळे बंद असलेली ऊस वाहतूक सुरू झाल्यामुळे कोरेगाव शहरात वाहतूक कोंडी झाल्याची चर्चा होती.
दरवर्षी ऊसवाहतुकीमुळेच कोरेगाव शहरात वाहतुकीची कोंडी होत असते. सोमवारी झालेल्या या वाहतुक कोंडीमध्ये ॲम्ब्युलन्स वाहने अडकली होती. त्याचबरोबर पंढरपूर, सोलापूर, तूळजापूर आदी लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना विविध समस्यांचा सामना करावा लागला. ५ वाजण्याच्या दरम्यान शाळा सुटते त्यामुळे विद्यार्थी, विद्यार्थीनीनाही वाहतुक कोंडीचा समना करावा लागला. मुले शाळेतुन लवकर न आल्यामुळे पालकांचीही चिंता वाढली होती. अनेक पालकांनी मुले शाळेतून घरी वेळत आल्यामुळे शिक्षकांशी संपर्क साधला.रात्री ८ वाजण्याच्या दरम्यान वाहतूकीची कोंडी फुटल्यानंतर सर्वानीच सुटकेचा नि:श्वास सोडला. कोरेगावकरांना आणखी कित्ती दिवस वाहतुक कोंडीचा समाना करावा लागणार ? अशी चर्चाही नागरिकांमध्ये रंगली होती.
कोरेगावात तीन तास वाहतूक कोंडी; वाहनाच्या लांबच-लांब रांगा, कोंडी फोडताना पोलिसांच्याही नाकीनऊ
by Team Satara Today | published on : 16 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा