संगम माहुली जिलेटिन स्फोटातील आरोपी 28 वर्षानंतर निर्दोष; सातारा अतिरिक्त जिल्हा न्यायालयाचा निकाल

स्फोटात १८ जणांचा भीषण मृत्यू; ४२ जण गंभीर जखमी, सबळ पुराव्या प्रभावी न्यायालयालाही आरोपींना निर्दोष मुक्तता करावी लागली

by Team Satara Today | published on : 17 October 2025


सातारा : सातारा शहरालगत असलेल्या संगम माहुली येथे सुमारे २८ वर्षांपूर्वी जिलेटिनच्या कांड्या वाहून नेणाऱ्या वाहनाचा स्फोट झाला होता. त्या भीषण स्फोटामध्ये १८ जण ठार तर ४२ लोक जखमी झाले होते. या स्फोटामुळे सातारा शहरासह जिल्हा हादरला होता. दरम्यान यामधील संशयित आरोपींची सुमारे २८ वर्षानंतर सबळ पुराव्या अभावी सातारा येथील अतिरिक्त जिल्हा न्यायालयाने  दि. १४ ऑक्टो. रोजी निर्दोष मुक्तता केली आहे.

याबाबत माहिती अशी की, माहुली (संगम) ता. सातारा येथे दि. १३ मार्च १९९७ रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास जिलेटीन कांड्याचा भीषण स्फोट झाला होता. स्फोटाची तीव्रता एवढी होती की, ज्या ठिकाणी स्फोट झाला त्याच्या बाजूला असलेल्या शेतात काम करणाऱ्या महिलांच्या शरीराच्या ठिकऱ्या उडून शरीरांचे अवयव बाजूला असलेल्या झाडांवर फेकले गेले. या भीषण स्फोटामध्ये आजूबाजूचे 18 जण जागी ठार झाले होते तर तब्बल 42 लोक जखमी झाले होते. स्फोट झाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल केले होते. या स्फोटामुळे साधारणतः तीन किलोमीटरच्या परिघातील घरांची पडझड झाली होती.\

यानंतर पोलिसांनी जिलेटीन कांड्याचा साठा करणाऱ्या अल्लाबेली डूकलजी मन्सुरी, सलीम अल्लाबेल्ली मन्सुरी व शब्बीर अल्लाबेली मन्सुरी यांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. फिर्यादीमध्ये असे म्हटले होते की, यातील संशयित आरोपींनी संगम माहुली येथील त्यांच्या मालकीच्या असणाऱ्या फरशीच्या कारखान्यामध्ये जिलेटीन कांड्यांचा साठा केला होता. तसेच या कारखान्यामध्ये बेकायदेशीरपणे स्फोटके ठेवण्यात आली होती. तसेच स्फोटके नियम व कायद्याचे पालन केले नव्हते. या बेजबाबदार कृत्यामुळेच हा स्फोट झाल्याचा निष्कर्ष पोलिसांनी तपासद्वारे मांडला होता.

या गुन्ह्याचे तपासाधिकारी म्हणून तत्कालीन डीवायएसपी दत्तात्रेय कराळे यांनी तपास केला होता. या तपासाच्या आधारे पोलिसांनी न्यायालयामध्ये ६० दिवसांच्या आत मध्ये दोषारोपपत्र दाखल केले होते. यामधील संशयित आरोपी शब्बीर अल्लाबेली मंसूरी याने गुन्हा कबूल केला होता. मात्र यातील दुसरी संशयित आरोपी सलमा अल्लाबेली मंसूरी हिने गुन्हा मान्य नसल्यामुळे हा खटला चालवण्यात आला. या खटल्यामध्ये 23 साक्षीदार तपासण्यात आले होते. मात्र प्रत्यक्ष खटल्याच्या सुनावणी वेळी साक्षीदार हजर न राहणे. तसेच बचाव पक्षाच्या वकिलांनी ज्यांच्या नावावर म्हणजेच सलमा अल्लाबेली मन्सुरी हिच्या नावावर असणारा जिलेटिन कांड्यांचा ठेवण्याचा परवाना तसेच स्फोटके व जिलेटीन काड्यांची वाहतुकी साठी लागणारा स्फोटके वाहतूक परवाना सातारा येथील परिवहन विभागाने दिला होता. असा जोरदार युक्तिवाद केला. परिणामी, स्फोटके वाहतुकीचे हव्या असलेल्या नियमाप्रमाणे या गाड्या होत्या तसेच संबंधितांनी जिलेटिन कांड्या वापरण्याची काळजी घेतली होती. हे पुरावे आणि बचाव पक्षाच्या वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य मानून सातारा येथील अतिरिक्त जिल्हा न्यायालयाने संशयित आरोपींची निर्दोष मुक्तता केली. 

या खटल्यामध्ये आरोपींच्या वतीने साताऱ्यातील ॲड. हेमंत लावंड व ॲड. शिर्के यांनी काम पाहिले. 

२८ वर्षानंतरही भळभळत्या  जखमा…

१३ मार्च १९९७ रोजी साताऱ्यावर मानवनिर्मित संकट कोसळले. कुणाच्याही मनी ध्यानी नसताना काळजाचा ठोका चुकला. संगम माहुली परिसर आणि शहरात कानठळ्या बसवणाऱ्या आवाजाने एकच खळबळ उडाली. पोलिसांसह सातारा शहरातील हजारो लोक कानोसा घेत माहुलीच्या दिशेने पळू लागले. स्फोट झालेल्या परिसरात असणाऱ्या झाडांवर अनेक महिलांच्या मृतदेहाचे ठिकऱ्या झालेले अवयव लोंबत होते. अतिशय भयानक असा हे दृश्य बघून लोकांची बोबडी वळाली, नेमके काय झाले हे कोणालाच समजत नव्हते. काही वेळानंतर हा स्फोट जिलेटिन कांड्यांचा असल्याचे पोलिसांनी जाहीर केल्यानंतर ज्यांनी हा साठा केला होता. त्यांच्यावर तात्काळ कारवाईची मागणी केली होती. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी तत्काळ संबंधितांना ताब्यात घेत अटक केली. ज्यांचे आप्तेष्ट या घटनेत मृत्युमुखी पडले त्यांना प्रशासनाने मदत देण्याची घोषणा केली होती. मात्र ही घोषणा गेल्या 28 वर्षांमध्ये हवेत विरून गेली. मधल्या काळात माहुलीच्या पुलाखालून  बरेच पाणी वाहून गेले. लोकही ही घटना विसरून गेले. मात्र सबळ पुराव्या प्रभावी न्यायालयालाही संबंधित आरोपींना निर्दोष मुक्तता करावी लागली, मात्र या स्फोटामध्ये मृत्युमुखी पडलेल्या आप्तेष्टांच्या जखमा २८ वर्षानंतरही भळभळत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
महिलांच्या 103 तक्रारींचा जागेवर निपटारा; सासपडे प्रकरणातील आरोपीला फाशी होईपर्यंत पाठपुरावा करणार : महिला आयोगाचे अध्यक्ष रूपाली चाकणकर
पुढील बातमी
सातारा जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आलेली महिला बेपत्ता

संबंधित बातम्या