सातारा : सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाबाबत सुरू असलेल्या विविध राजकीय चर्चांवर मंत्री शंभूराज देसाई यांनी अत्यंत सावध भूमिका मांडली आहे. कोणत्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण असावा, याचा सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा असून ते जो निर्णय घेतील, तो आपल्याला पूर्णपणे मान्य असेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीच्या गोटात रस्सीखेच सुरू असल्याच्या चर्चा असतानाच देसाई यांच्या या विधानामुळे पालकमंत्रिपदाचा चेंडू आता महायुतीच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या कोर्टात गेला आहे. स्वतःहून कोणतीही दावेदारी न सांगता त्यांनी या प्रकरणी पक्षादेश आणि वरिष्ठ नेत्यांचा निर्णय शिरसावंद्य मानणार असल्याचे संकेत दिले आहेत.
सातारा जिल्हा परिषदेच्या राजकारणावरून महायुतीत निर्माण झालेल्या वादावर बोलताना, यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या दालनात बैठक पार पडल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली याचा तपशील उघड करणे योग्य नसले, तरी बैठकीनंतर खुद्द मुख्यमंत्र्यांनीच या वादावर पडदा पडल्याचे स्पष्ट केले होते, अशी आठवण त्यांनी करून दिली.
आपण महायुती धर्माचे प्रामाणिकपणे पालन करत असून नेतृत्वाच्या सूचनांनुसारच पुढील वाटचाल राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. देसाई यांच्या या संयमी भूमिकेमुळे आता साताऱ्याच्या पालकमंत्रिपदाची धुरा नेमकी कोणाच्या खांद्यावर सोपवली जाते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे राजकीय लक्ष वेधले गेले आहे.