सातारा : पुणे येथे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वतीने घेण्यात येणाऱ्या 'ज्ञानयाग' प्रशिक्षणासाठी अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या मार्फत ४६ शेतकरी पाठवण्यात आले आहेत. या प्रशिक्षणात प्रति एकरी ऊस उत्पादन वाढावे तसेच उत्पादन खर्च कमी व्हावा याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
कारखान्याचे मार्गदर्शक तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रशिक्षणासाठी पाठवले जाते. सदर प्रशिक्षणात शेतकऱ्यांना माती परीक्षण, खत व्यवस्थापन, खोडवा व्यवस्थापन, रोग व कीड नियंत्रण, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, जैविक खतांचा वापर, नवीन ऊस जातीची माहिती, बियाणे मळा याबाबत तज्ञांमार्फत प्रत्यक्ष प्लॉटवर मार्गदर्शन मिळणार आहे. या शिबिराचा लाभ सहभागी शेतकऱ्यांना तर होणारच आहे याशिवाय या शेतकऱ्यांच्या मार्फत गावागावातील शेतकऱ्यांनाही याचा फायदा होणार आहे.
कारखान्याचे चेअरमन यशवंत साळुंखे, संचालक वसंत पवार, बजरंग जाधव, सुनील निकम, नितीन पाटील, कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते, शेती अधिकारी विलास पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीत या ४६ शेतकऱ्यांना विशेष बसने रवाना करण्यात आले.