कराड : विनापरवाना शस्त्रे बाळगणार्या कार्तिक अनिल चंदवानी (वय 19), अक्षय प्रकाश सहजराव (वय 28, दोघे रा. लाहोटीनगर, मलकापूर, ता. कराड) आणि रूपेश धर्मेंद्र माने (वय 22, रा. कृष्णा अंगण, बंगला नं. 3, वाखाण रोड, कराड) यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. कराड-शामगाव रस्त्यावर करवडी, ता. कराड गावच्या हद्दीत रविवारी (दि. 19) दुपारी ही कारवाई करण्यात आली. संशयितांकडून देशी बनावटीची तीन पिस्तुले, जिवंत काडतुसे, दोन मोबाइल आणि कार, असा आठ लाख 51 हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, करवडी गावाच्या हद्दीत तीन जण रविवारी दुपारी देशी बनावटीची पिस्तुले विकायला येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना मिळाली. देवकर यांच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित फार्णे, विश्वास शिंगाडे, पोलीस उपनिरीक्षक परितोष दातिर, आतिश घाडगे, विजय कांबळे, शरद बेबले कराड तालुका पोलीस ठाण्याचे संभाजी चौधरी यांच्या पथकाने कराड-शामगाव रस्त्यावर करवडी गावच्या हद्दीत गस्त सुरू केली. त्यावेळी मारुती ब्रिझा कार करवडीच्या दिशेने येताना दिसली. पोलीस पथकाने ही कार अडवून, संबंधितांची झडती घेतली असता, त्यांच्याकडे देशी बनावटीची तीन पिस्तुले आणि तीन जिवंत काडतुसे आढळली. संशयितांवर अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी भारतीय हत्यार कायदा कलम 25(3) प्रमाणे कराड तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदण्यात आला आहे.
या कारवाईत हवालदार नीलेश फडतरे, साबिर मुल्ला, प्रवीण फडतरे, अमित झेंडे, अजय जाधव, अमित सपकाळ, अमित माने, अविनाश चव्हाण, स्वप्निल कुंभार, गणेश कापरे, ओंकार यादव, स्वप्निल शिंदे, मोहन पवार, विशाल पवार, रोहित निकम, पृथ्वीराज जाधव, संकेत निकम, सचिन ससाणे, रविराज वर्णेकर, शिवाजी गुरव, संदीप कांबळे, मिलिंद बैले, विकास शेडगे, योगेश गायकवाड हे सहभागी झाले होते.