पुसेगावव : पुसेगाव ते फलटण रस्त्यावरील डिस्कळ (ता. खटाव) गावच्या हद्दीत एका अज्ञात भरधाव वाहनाने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. महेंद्र जालींदर माने (वय ४०, रा. डिस्कळ, ता. खटाव, जि. सातारा) असे या अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पुसेगाव पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ५ जून रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास महेंद्र माने हे आपल्या मोटारसायकलवरून (क्रमांक एमएच ११ बीएम ६४७६) पुसेगाव-फलटण रस्त्याने डिस्कळच्या दिशेने येत होते. मौजे डिस्कळ गावच्या हद्दीतील गावओढ्याजवळ ते आले असता, पाठीमागून येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने त्यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, गंभीर दुखापत झाल्यामुळे महेंद्र माने यांचा घटनास्थळावरच मृत्यू झाला. या अपघातात त्यांच्या मोटारसायकलचेही मोठे नुकसान झाले आहे. अपघात घडल्यानंतर संबंधित अज्ञात वाहन चालक वाहनसह घटनास्थळावरून पळून गेला.
या संदर्भात मृत महेंद्र यांचे चुलते अविनाश सिताराम माने (वय ७३, व्यवसाय-शेती, रा. डिस्कळ) यांनी पुसेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पुसेगाव पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुसेगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक एन. जे. खुणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेख या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.