सातारा : अमेरिकेच्या सॅकरामेन्टो येथे अपघातानंतर अठरा दिवस कोमात असणाऱ्या नीलम शिंदे हिने सोमवारी वडिलांच्या हाकेला प्रतिसाद दिला. अतिदक्षता विभागात अत्यवस्थ असलेल्या लेकीला हाक मारल्यानंतर डोळ्यांची किंचित हालचाल झाल्याने वडिलांच्या येण्याने नीलम उपचारांना प्रतिसाद देईल, असा विश्वास तेथील वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
मूळची उंब्रज येथील असणारी नीलम शिंदे शिक्षणाच्या निमित्ताने अमेरिकेत असून, अपघातानंतर अतिदक्षता विभागात उपचार घेत आहे. व्हिसा मिळविण्यात येणाऱ्या अडचणींचे विघ्न सुटून तिचे वडील तानाजी शिंदे आणि मामाचा मुलगा गाैरव कदम चोवीस तासांच्या प्रवासानंतर यूसी डेव्हिस मेडिकल सेंटर सॅकरामेन्टो येथे पोहोचले. रात्री उशिरा पोहोचल्यामुळे नीलमवर उपचार करणाऱ्या वैद्यकीय टीमबरोबर वडिलांचा संवाद झाला नाही. मात्र, तिची काळजी घेणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वडिलांची हाक ऐकल्यावर डोळे बंद असतानाही तिच्या बुबुळांची हालचाल टिपली.
नीलमचा १४ फेब्रुवारी २०२५ रोजी अमेरिकेत अपघात झाला. व्यायामासाठी चालत असताना एका चारचाकी गाडीने पाठीमागून तिला जोरदार धडक दिली. या अपघाताला दोषी असलेल्या कारचालकाला पोलिसांनी पकडले आहे. या अपघातात नीलमच्या डोक्याला आणि दोन्ही हाता-पायांना दुखापत झाली आहे. तिच्या छातीलाही मार लागला असल्याने तिची प्रकृती गंभीर आहे.