सातारा : वाढे फाटा परिसरात व्यवसायिकाला कोयत्याचा धाक दाखवून गंभीर दुखापत करत प्रतापसिंहनगरमधील टोळक्याने धुडगूस घातला. संशयितामध्ये सराईत गुन्हेगाराचा समावेश असून पोलिसांनी दोघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. याबाबत केतन श्रीराम लाटकर (वय 29, रा. शुक्रवार पेठ, सातारा) यांनी तीन अज्ञातांविरुध्द तक्रार दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, ही घटना दि. 28 ऑगस्ट रोजी मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. तक्रारदार लाटकर तेथे थांबले असताना संशयित तीन अनोळखी युवकांनी त्यांना बोलावले. यावेळी तक्रारदार यांचा मोबाईल संबंधितांनी जबरस्तीने चोरला. यावेळी तक्रारदार यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता संशयितांनी धारदार कोयत्यासारखे शस्त्र काढून दहशत माजवली. तसेच तक्रारदार लाटकर यांच्या डोक्यावर, पायावर, पाठीवर, डाव्या हातावर वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले. लाटकर जखमी अवस्थेत पडल्यानंतर संशयितांनी तेथून दुचाकीवरुन पळ काढला.
या घटनेची माहिती सातारा तालुका पोलिसांना समजल्यानंतर त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमी लाटकर यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर पोलिसांनी त्यांचा जबाब घेतला. संशयितांचे वर्णन घेवून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. पोनि निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाला सुरुवात केल्यानंतर बुधवारी सांयकाळी दोन युवकांना ताब्यात घेण्यात आले. संशयित हल्लेखोर प्रतापसिंहनगर येथील असून मुख्य संशयित हल्लेखोर पसार असल्याचे समोर येत आहे.
वाढे फाटा परिसरात टोळक्याचा धुडगूस; दोन अल्पवयीन ताब्यात
by Team Satara Today | published on : 29 August 2024

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा