बड्या उद्योगपतींना कर्जाच्या बाबतीत सूट; शेतकऱ्यांनाही न्याय मिळावा - शरद पवार, द्राक्ष परिसंवाद आणि ६६व्या वार्षिक अधिवेशनाचे उद्घाटन

by Team Satara Today | published on : 24 August 2026


लोणी काळभोर : शेती आर्थिकदृष्ट्या अडचणीची होत असून, शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे केंद्र व राज्य सरकारने गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. बड्या उद्योगपतींचे व्याज माफ करून कर्जाचे हप्ते वाढवून दिले जातात, त्याचप्रमाणे काळ्या आईची सेवा करणाऱ्या शेतकऱ्यांनाही न्याय मिळाला पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले. आम्ही सत्तेत नाही; मात्र सरकारच्या कानावर शेतकऱ्यांचे प्रश्न घालणे हे आमचे कायमचे काम राहणार आहे,” असेही पवार यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या वतीने आयोजित तीन दिवसीय द्राक्ष परिसंवाद आणि ६६व्या वार्षिक अधिवेशनाचे सोमवारी कवडीपाट येथील लक्ष्मी लॉन्समध्ये शरद पवार यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते. २४ ते २६ ऑगस्टदरम्यान होणाऱ्या या अधिवेशनात राज्यातील हजारो द्राक्ष उत्पादक शेतकरी सहभागी झाले आहेत. पवार म्हणाले, “गेल्या अनेक वर्षांपासून या सोहळ्याला माझी हजेरी चुकलेली नाही. आज शेतीसमोर अनेक अडचणी आहेत. त्यामुळे आपण सर्वांनी शेतीबाबत गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.”

शेतीचे क्षेत्र घटत असताना लोकसंख्या वाढतेय

१९४७ मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा सुमारे ८० टक्के लोक शेती करत होते. मात्र, वाढते महामार्ग, रेल्वे आणि विविध प्रकल्पांमुळे शेतीचे क्षेत्र सातत्याने कमी होत आहे. रस्ते झाले की जमीन जाते, रेल्वे वाढली की जमीन जाते आणि अन्य प्रकल्प उभे राहिले तरी शेतीची जमीन कमी होते. त्यामुळे शेतीचे क्षेत्र घटत असताना त्यावर अवलंबून असणाऱ्या वर्गाची संख्या वाढत आहे, अशी चिंता पवार यांनी व्यक्त केली.

कुटुंबातील सर्वांनी शेती करण्याची गरज नाही

शेती आर्थिकदृष्ट्या अडचणीची होत असल्याने कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने शेतीच केली पाहिजे, असे नाही. कुटुंबातील एक-दोन व्यक्तींनी शेती करावी, तर इतरांनी विविध व्यवसाय करावेत. त्यामुळे कुटुंबाची सांपत्तिक स्थिती सुधारण्यास मदत होईल, असे पवार यांनी सांगितले.

शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करा

शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कंपन्यांवर सरकारने कारवाई केली पाहिजे. द्राक्ष शेतीमध्ये वापरल्या जाणाऱ्या बनावट औषधांवर केंद्र सरकारने विशेष लक्ष देण्याची गरज आहे. अशा औषधांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. त्यामुळे या प्रकाराला आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.

दरम्यान, अधिवेशनाच्या निमित्ताने भव्य कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. द्राक्ष व वाईन उत्पादन तंत्रज्ञान, आधुनिक बेदाणा प्रक्रिया, अत्याधुनिक यंत्रसामग्री व शेतीची विविध अवजारे प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत. देशभरातील कृषी कंपन्यांनी स्टॉल्स उभारले असून, शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती घेत आहेत.

तीन दिवसांच्या परिसंवादात हवामान बदल, दर्जेदार उत्पादन, निर्यातवाढ, बाजारपेठेतील संधी आणि द्राक्ष उत्पादकांसमोरील विविध आव्हानांवर तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. उद्घाटन सोहळ्यास माणिकराव कोकाटे यांच्यासह कृषी क्षेत्रातील मान्यवर, शास्त्रज्ञ, द्राक्ष बागायतदार संघाचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कॉकरोच जनता पार्टीचे सौरव दासच्या घराचा पत्ता लीक करणाऱ्यांना न्यायालयाचा दणका; समन्स बजावले, सोशल मीडियावरील व्हिडिओही हटवले
पुढील बातमी
५८ लाख नोंदींची यादी द्या; शिष्टमंडळासमोर अंतरवाली सराटी येथे जरांगेंचा संताप, थेट शिंदे समितीशी फोनवरून खलबते

संबंधित बातम्या