पुरोगामी सातारकरांचा पर्यावरणपूरक गणेशोत्सवास अभूतपूर्व प्रतिसाद

जिल्हाधिकारी संतोष पाटील; पाण्याची स्थळे दुषित होण्यापासून बचावली

by Team Satara Today | published on : 08 September 2025


सातारा,  दि. 8 : सातारा जिल्ह्यामध्ये यंदाचा पर्यावरणपूरक गणेशोत्सव 2025 मोठ्या उत्साहात व यशस्वीपणे साजरा करण्यात आला. या उपक्रमाला जिल्ह्यातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. विशेषतः निर्माल्य व्यवस्थापन उपक्रमाला सर्वाधिक प्रतिसाद मिळाल्याचे माहिती जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिली.

जिल्ह्यात सरासरी 54 टन निर्माल्य जमा होऊन कंपोस्ट खत तयार करण्यासाठी पाठविण्यात आले. या प्रक्रियेसाठी 338 घंटागाड्या व 1049 ट्रॅक्टर वापरण्यात आले. यामध्ये विविध संस्था व नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग होता. यामुळे जिल्ह्यातील नदी, तळी व विहिरींचे पाणी दूषित होण्यापासून मोठ्या प्रमाणावर बचाव झाला असल्याचेही त्यांनी सांगितले.

याबाबत अधिक माहिती देताना मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन म्हणाल्या, पर्यावरणपूरक गणेशमूर्ती विसर्जन उपक्रमांतर्गत एकूण 880 सार्वजनिक गणपती व 46,559 घरगुती गणपतींचे पर्यावरणपूरक विसर्जन करण्यात आले. तसेच 4,511 मूर्ती पुन्हा कुंभारांकडे परत देण्यात आल्या, तर 47,439 मूर्ती ग्रामपंचायतींकडे जमा होऊन विधिवत पुनर्विसर्जन करण्यात आले. अशा प्रकारे एकूण 62,137 मूर्तींचे पर्यावरणपूरक व्यवस्थापन करण्यात आले.

या उपक्रमाच्या यशामध्ये जिल्ह्यातील मंत्री महोदयांचे आवाहन, ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग आणि अधिकारी, पदाधिकारी यांचे सहकार्य महत्त्वपूर्ण ठरले. सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तलाठी, शिक्षक, महिला बचत गट, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, युवक मंडळे, गणेश मंडळे यांनी आपापला मोलाचा सहभाग नोंदविला असल्याची माहिती ग्रामपंचायत उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई यांनी दिली

संकलित निर्माल्यापासून नाडेप व गांडूळ खत प्रकल्पामध्ये खतनिर्मिती करावी, तसेच प्लास्टिक वेगळे संकलित करून केंद्रावर पाठवावे, अशी सूचना उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) मा. प्रज्ञा माने-भोसले यांनी दिली. तर, संकलित झालेल्या मूर्तींची योग्य नोंद ठेवून त्यांचे विधिवत पुनर्विसर्जन करावे किंवा कुंभारांना परत द्याव्यात, अशी सूचना अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद यांनी केली.

अधिकारी, कर्मचाऱ्यांसह जिल्हावासियांचे कौतुक

या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा व तालुकास्तरीय सर्व अधिकारी, कर्मचारी, खातेप्रमुख, तहसीलदार, गटविकास अधिकारी, मंडलाधिकारी, बीआरसी यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले. या सर्वांचे विशेष कौतुक मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी केले.

सातारा जिल्ह्यातील सर्वांच्या सक्रिय सहभागामुळे पर्यावरणपूरक गणेशोत्सव 2025 यशस्वीरित्या पार पडला. गावागावच्या विहिरी, नद्या व तळी प्रदूषित होण्यापासून प्रशासनाला यश मिळाले. साताऱ्याने पर्यावरणपूरकतेचा नवा आदर्श निर्माण केल्याबद्दल जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी सर्व नागरिक व जिल्हावासियांचे कौतुक केले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सकाळी उठल्यानंतर नियमित करा 'ही' कामे, वितळून जाईल चरबी
पुढील बातमी
दुचाकी चालक मृत्यूप्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा

संबंधित बातम्या