वडीगोद्री : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई आंदोलनावर ठाम असल्याचे स्पष्ट केले. ‘‘परवा सकाळी ११ वाजता मुंबईकडे निघणार असून लोकशाही मार्गाने आंदोलन करू. सरकारला पुन्हा आठ दिवसांची संधी देत आहोत. प्रश्न सुटले नाहीत तर १९ सप्टेंबरपासून मुंबईत उपोषण सुरू करू,’’ अशी घोषणा त्यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली.
‘‘सरकारला मते लागतात; मात्र समाजाचे प्रश्न सोडवायचे नाहीत,’’ असा आरोप करत जरांगे यांनी सरकारवर जोरदार टीका केली. राज्यातील काही भागांत झालेल्या पावसामुळे शेतकरी सुखावला असून शेतीची कामे पूर्ण झाल्याने मुंबईच्या आंदोलनात मोठ्या संख्येने मराठा समाज सहभागी होईल, असा दावा त्यांनी केला.
‘सहकाऱ्यांच्या चौकशा जाणीवपूर्वक’
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या जवळच्या सहकाऱ्यांच्या चौकशा सुरू केल्याचा आरोप जरांगे यांनी केला. ‘‘आंदोलन सुरू असतानाच चौकशा का लावल्या जात आहेत? शनिवारी-रविवारी चौकशी लावण्याची घाई का? माझ्या जवळच्या लोकांना त्रास दिला जात आहे. चौकशांना शरण जाऊन मी घाबरणार नाही,’’ असे ते म्हणाले.
चौकशीच्या मुद्द्यावरून त्यांनी ईडी कार्यालयाला घेराव घालण्याचाही इशारा दिला. ‘‘माझ्या जवळच्या लोकांची चौकशी लावता, मग तुम्हाला मदत करणाऱ्यांची चौकशी कशी होत नाही, हे मी पाहतो,’’ असे ते म्हणाले.
‘बावनकुळेंनी मैदानात यावे’
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरही जरांगे यांनी तीव्र शब्दांत टीका केली. सरकारच्या भूमिकेवरून त्यांनी बावनकुळे यांना थेट आव्हान दिले. तसेच मराठा आंदोलनाला रोखण्याचा प्रयत्न केल्यास भाजपविरोधात भूमिका घेण्याचा इशाराही त्यांनी दिला.
शिवराळ वक्तव्यांबद्दल शब्द मागे
शिवसेना नेते संजय राऊत यांच्या टीकेला उत्तर देताना जरांगे यांनी आपल्या भाषेवर स्पष्टीकरण दिले. ‘‘माझी भाषा शिवराळ वाटत असेल तर मी ते शब्द आणि शिव्या मागे घेतो. ती खेड्यातील भाषा आहे. मात्र कुणाला वाईट वाटत असेल तर माझे शब्द मागे घेतो; प्रश्न सोडवा,’’ असे त्यांनी सांगितले.
‘मला गोळ्या घातल्या तरी शरण जाणार नाही’
आंदोलनाच्या भवितव्याबाबत बोलताना जरांगे भावुक झाले. ‘‘मी मराठ्यांना पुढे दिसेल की नाही, मला माहिती नाही. त्यामुळे सगळ्यांनी एकत्र या. शिंदे-फडणवीस यांनी कितीही त्रास दिला तरी मी शरण जाणार नाही. मला गोळ्या घातल्या तर मी मरेन; पण शरण जाणार नाही. मेलो तर माझ्या अंत्यसंस्काराला या,’’ असे ते म्हणाले.
‘‘सरकार माझी निष्ठा विकत घेऊ शकत नाही. मुंबईला यायचे नाही म्हणून मला त्रास देण्याचे काम सुरू आहे,’’ असा आरोपही त्यांनी केला. आंदोलन शांततेच्या मार्गानेच करणार असल्याचे त्यांनी पुन्हा स्पष्ट केले.
मुंबईकडे कूच करण्यावर मनोज जरांगे ठाम; सरकारला पुन्हा आठ दिवसांची मुदत, १९ सप्टेंबरपासून मुंबईत उपोषण सुरू करू
by Team Satara Today | published on : 13 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
खंबाटकी घाटात नवीन बोगद्यात ट्रेलरला आयशरची जोरदार धडक; चालक गंभीर जखमी
September 13, 2026
पाळीव कुत्र्यावर कोयत्याने वार; एकावर गुन्हा
September 13, 2026
वाहतुकीच्या वादातून वकिलाला मारहाण; दोनजणांवर गुन्हा
September 13, 2026
अजिंक्यतारा कारखान्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा
September 12, 2026
गौरी-गणपतीच्या खरेदीला साताऱ्यात वेग
September 12, 2026
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सातार्यातील वाहतुकीत बदल
September 12, 2026
चारित्र्याच्या संशयावरुन विवाहितेचा छळ; पतीसह चौघांवर गुन्हा
September 11, 2026