कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोलमाफी

ना. शिवेंद्रसिंहराजे; महायुती सरकारचे गणेशोत्सवासाठी खास ‘गिफ्ट’

by Team Satara Today | published on : 22 August 2025


सातारा :  गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाचा आत्मा आहे. वर्षभर वाट पाहणारे लाखो गणेशभक्त आपल्या बाप्पाच्या आगमनासाठी कोकणच्या मातीत परततात. या भाविकांच्या सोयीसाठी महायुती सरकारने यंदा मोठा निर्णय घेतला आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी ही माहिती दिली असून दि. २३ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या कालावधीत मुंबई-गोवा महामार्गावरून कोकणात जाणार्‍या तसेच पश्चिम महाराष्ट्रातून जाणार्‍या मुंबई-बंगळुरू ४८ या महामार्गावर टोलफामी देण्यात आली आहे. या निर्णयाबद्दल ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहेत.

मुंबई- बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग ४८,  मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६, सार्वजनिक बांधकाम विभाग व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारितील सर्व महामार्गांवरील टोलनाक्यांवर ही टोलमाफी लागू राहणार आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेससह खाजगी वाहनांना या निर्णयाचा लाभ होणार आहे. शासनाने या योजनेसाठी खास ‘गणेशोत्सव २०२५’ व ‘कोकण दर्शन’ अशा आशयाचे स्टीकर्स स्वरूपाचे पथकर माफी पासेस त्यावर गाडी क्रमांक, चालकाचे नाव असा मजसकूर नमूद करून ते स्टीकर्स आवश्यक त्या संख्येनुसार संबंधित परिवहन विभाग, वाहतूक पोलिस, आरटीओ यांनी समन्वय साधून पोलिस स्टेशन, वाहतूक पोलिस चौकी व संबंधित आरटीओ ऑफिसेसमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच हे पास परतीच्या प्रवासासाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेस व इतर वाहने महाराष्ट्रातील ज्या जिल्ह्यातून येणार आहेत, तेथील पोलिस खाते किंवा प्रादेशिक परिवहन खाते यांच्याकडील पासेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. संबंधित जिल्ह्यातून गौरी-गणपती उत्सवात वाहतुकीसाठी रवाना होणार्‍या सर्व बसेसना पथकर माफी असलेले पासेस संबंधित वाहनांना लावून संबंधित बसेस रवाना कराव्या लागणार आहेत. ग्रामीण व शहरी पोलिस व आरटीओ कार्यालयामार्फत दिल्या जाणार्‍या पासेसची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाला सादर करावी लागणार आहे. पोलिस व परिवहन विभागाने गणेशोत्सवाच्या काळात पास सुविधा आणि त्यांच्या उपलब्धतेबाबतची माहिती जनतेला होण्यासाठी आवश्यकतेनुसार त्याची प्रसिद्धी करायची आहे. कोकणात जाणार्‍या मार्गांवर वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, महामार्ग प्राधिकरण, पोलिस आणि परिवहन विभाग एकत्रितपणे काम करणार आहेत. भाविकांच्या सुरक्षिततेला आणि सोयीसुविधांना प्राधान्य दिले जाणार आहे.

गणेशोत्सव हा धार्मिक सोहळा असून तो महाराष्ट्राच्या एकात्मतेचे प्रतीक आहे. लाखो गणेशेभक्तांचा प्रवास सुखकर करण्यासाठी शासनाने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. २३ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या काळात कोकणातील प्रत्येक रस्ता भक्तांच्या जयघोषाने दुमदुमणार आहे. शासनाने दिलेली ही टोलमाफी भाविकांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे. दरम्यान, शासनाच्या या निर्णयामुळे प्रवास खर्चात व वेळेत बचत होईल आणि बाप्पांच्या दर्शनाचा आनंद अधिक द्विगुणित होईल, अशा प्रतिक्रिया भाविकांकडून व्यक्त होत आहेत.

पासेस कसे मिळवायचे?

राज्य शासनाने या योजनेसाठी खास ‘गणेशोत्सव २०२५’ व ‘कोकण दर्शन’  असे नाव असलेले पासेस तयार केले आहेत. या पासेसवर वाहन क्रमांक, वाहनमालकाचे नाव आणि प्रवासाच्या तारखा नमूद असतील. पासेस जाणे व परतीचा प्रवास या दोन्हीसाठी ग्राह्य राहतील. हे पासेस संबंधित वाहतूक पोलिस ठाणे, प्रादेशिक परिवहन कार्यलये (आरटीओ) आणि स्थानिक पोलिस ठाण्यांमधून उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

गणेशोत्सव हा आपल्या जीवनातला अत्यंत पवित्र आणि आनंदाचा क्षण असतो. कोकणात आपल्या बाप्पाच्या सोहळ्याला जाणार्‍या भाविकांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी ही टोलफामी दिली आहे. टोलमुळे प्रवाशांवरचा आर्थिक भार कमी होईल आणि त्यांचा प्रवास सुलभ व आनंददायी बनेल. भाविकांचा हा सोहळा कोणत्याही अडथळ्याविना पार पडावा ही शासनाची भूमिका आहे. माझ्यासाठी ही टोलमाफी म्हणजे महायुती सरकारने गणेशभक्तांना दिलेली खरी भेट आहे.

-ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले

मंत्री, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
विकासकामांना निधी कमी पडू देणार नाही : ‎मंत्री मकरंद पाटील
पुढील बातमी
जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे कोट्यवधींचे नुकसान

संबंधित बातम्या