शिवसेनेचे विचार घराघरात पोहोचवा!

उपमुख्यमंत्री शिंदे यांचा जिल्हा प्रमुख रणजितसिंह भोसले यांना कानमंत्र

by Team Satara Today | published on : 13 June 2025


सातारा : नसानसांत रक्तात भिनलेली शिवसेना, हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा यज्ञकुंड तेवत ठेवणारे, धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांचे पाईक असलेले जिल्हा प्रमुख रणजितसिंह भोसले यांनी आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका विचारात घेवून शिवसेनेचे विचार घराघरापर्यंत पोहोचवावेत, असा कानमंत्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा प्रमुख रणजितसिंह भोसले यांना दिला.

रणजितसिंह भोसले यांची 31 मे 2025 रोजी शिवसेनेच्या सातारा जिल्हाप्रमुखपदी निवड करण्यात आली. यानंतर  महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज मंत्रालयातील कामकाजानंतर सातारा जिल्ह्यातील दरे गावी दोन दिवसांच्या मुक्कामासाठी येत असताना सातार्‍यात आले होते. त्यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख रणजितसिंह भोसले यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री शंभुराज देसाई, विद्यार्थी सेना जिल्हा प्रमुख संभाजी पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, हिंदुत्वाचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी सातारा जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे काम निष्ठेने करणारे आणि शिवसेेना वाढविण्यात जिल्हाप्रमुख म्हणून रणजितसिंह यांच्याकडे पाहिले जात आहे. शिवसेनेचा विचार रणजितसिंह यांचे वडील नानासाहेब भोसले यांनी ज्याप्रमाणे वाढवला, रुजवला आणि अंगिकारला. त्याचप्रमाणे आता स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारधारेनुसार रणजितसिंह भोसले यांनीही आपली वाटचाल राजकारणात ठेवली. त्यामुळेच थेट जिल्हा प्रमुख पदी काम करण्याची संधी त्यांना देण्यात आली आहे.

रणजितसिंह भोसले यांचे वडील नानासाहेब भोसले हे शिवसेनेचे पदाधिकारी, जिल्हाप्रमुख होते. शिवसेनेचे बाळकडू त्यांना त्यांच्या घरातूनच मिळालेले आहे. युवा सेनेचे जिल्हाप्रमुख म्हणुन त्यांनी जिल्ह्यात युवा सेना अधिक जोमाने वाढवली. पक्ष संघटन, कार्यकर्त्यांना बळ देणे, सर्वसामान्यांच्या हिताची काम करणे ही त्यांची हातोटी आहे, असेही त्यांनी सांगितले.


स्थानिक संस्थांच्या निवडणुकात रणजितसिंहांवर मोठी जबाबदारी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका विचारात घेता शिवसेनेनेही आक्रमक पध्दतीने बांधणी सुरु केली आहे. सातारा जिल्ह्यात पक्षवाढीच्या जबाबदारीबरोबर शिवसेना पक्ष वाढविण्याबाबत मायक्रोप्लॅनिंग केले जात आहे. याची मोठी जबाबदारीही रणजितसिंह भोसले यांच्यावर समन्वयक म्हणून दिली आहे. ती ते निश्चितच पार पाडतील, असा विश्वास यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाध्यक्ष रणजितसिंह भोसले यांचा सत्कार करताना व्यक्त केला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जल्लोषी स्वागत
पुढील बातमी
सातारचे साहित्य संमेलन दिशादर्शक ठरेल

संबंधित बातम्या